स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली, तरी इंग्रजांच्या ताब्यात महाराष्ट्रातील हा रेल्वे मार्ग; करोडो रुपयांची रॉयल्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:19 PM 2023-02-06T16:19:32+5:30 2023-02-06T16:24:46+5:30
तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतू असा एक रेल्वे मार्ग आहे ज्याच्यावर भारतीय रेल्वेला सव्वा कोटी रुपये रॉय़ल्टी भरावी लागत आहे. देशाला इंग्रजांच्या जोखडापासून स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. याच वर्षी स्वातंत्र्याचा अमृतकाळ देखील साजरा केला जात आहे. परंतू, असा एक रेल्वे मार्ग आहे जो आजही इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालेला नाही. भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले परंतू त्यात यश आलेले नाही. या रेल्वे मार्गासाठी इंग्रजांना १ कोटी २० लाख रुपये असेच द्यावे लागत आहेत.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतू असा एक रेल्वे मार्ग आहे ज्याच्यावर भारतीय रेल्वेला सव्वा कोटी रुपये रॉय़ल्टी भरावी लागत आहे. हा रेल्वे मार्ग ब्रिटनच्या एका कंपनीच्या आजही ताब्यात आहे. भारतीय रेल्वेने हा रेल्वेमार्ग अनेकदा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतू, कंपनीने तो वेळोवेळी फेटाळला. ही एक खासगी कंपनी आहे.
शकुंतला रेल्वे ट्रॅक असे या रेल्वेमार्गाचे नाव आहे आणि तो महाराष्ट्रातच आहे. या ट्रॅकवरून शकुंतला रेल्वे धावत होती. यामुळे या मार्गाचे नाव शकुंतला असे पडले. हा ट्रॅक महाराष्ट्रातील अमरावती ते मुर्तजापूर असा १९० किलोमीटरचा आहे. या ट्रॅकवरून शकुंतला एक्स्प्रेस सहा-सात तासांत आपला प्रवास पूर्ण करत असे.
सध्या या मार्गावरून शकुंतला ट्रेन धावत नाही. परंतू, स्थानिक लोक ती पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहेत. हा रेल्वे ट्रॅक नॅरोगेजचा आहे. चला जाणून घेऊया याचा इतिहास...
1857 मध्ये स्थापन झालेल्या किलिक, निक्सन आणि कंपनीने एजंट म्हणून काम करण्यासाठी सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी (CPRC) स्थापन केली होती. कंपनीने 1903 मध्ये 2 फूट 6 इंच (762 मिमी) नॅरो-गेज लाइन बांधली. याचे मुख्य कारण कापसाची वाहतूक हे होते.
विदर्भातील कापूस समृद्ध भागातून काढलेला कापूस मुर्तजापूर जंक्शनपर्यंत नेणे, तेथून मुख्य ब्रॉडगेज मार्गावरून मुंबईपर्यंत नेण्यासाठी ही रेल्वे ट्रॅक बांधला गेला होता. तेथीन हा कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पाठवला जात होता. मुर्तजापूर जंक्शन हा या रेल्वेचा केंद्रबिंदू होता. 1920 मध्ये दारव्हा-पुसद ही लाईन तोडण्यात आली.
1952 मध्ये मध्य रेल्वे अंतर्गत CPRC घेण्यात आली. तेव्हा मँचेस्टरमध्ये 1921 मध्ये तयार करण्यात आलेल्या ZD-स्टीम इंजिनने ही रेल्वे खेचली जात होती. 15 एप्रिल 1994 रोजी ते बंद करून डिझेल इंजिन जोडण्यात आले होते. शकुंतला एक्सप्रेस दिवसातून फक्त एकच परतीचा प्रवास करत होती. त्यासाठी मध्य रेल्वे ब्रिटीश कंपनीला १ कोटी २० लाख रुपये देत होती.
या रेल्वे ट्रॅकवर गेल्यास ब्रिटीशकालीन सिग्नल्स आणि इतर रेल्वे उपकरणे पाहायला मिळतील. डिझेल इंजिन बसवल्यानंतर बोगींची संख्याही सात झाली. ट्रेन बंद होईपर्यंत त्यात रोज एक हजाराहून अधिक लोक प्रवास करत होते.
शंकुलता एक्सप्रेस ट्रेन 2020 मध्ये शेवटची धावली होती, तेव्हापासून ती बंद आहे. भारत सरकार दरवर्षी या ब्रिटीश कंपनीला रॉयल्टी देते. परंतू कंपनीने आजवर एकदाही रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही. या रेल्वे ट्रॅकची दुरवस्था झाली आहे.
अशा परिस्थितीत ट्रेनचा वेगही 20 किलोमीटरपेक्षा जास्त करण्यात आला नाही. या सर्वांचा विचार करून ही ट्रेन बंद करण्यात आली आहे. अमरावतीचे माजी खासदार आनंद राव यांनी नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता काम सुरु आहे.