अबब! अचानक ७० फूट जमिनीत गेलं घर; चंद्रपूरातील घटनेने सगळेच हादरले, पाहा PHOTO By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 08:19 PM 2022-08-27T20:19:16+5:30 2022-08-27T20:22:08+5:30
चंद्रपुरातील घुग्घुस येथे भुस्खलन झाल्यानं एक अख्खं घर ७० फूट जमिनीत गाडलं गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वेकोलीच्या खाणी लगत असलेल्या घुग्घुस येथील आमराई वार्डात हा दुर्दैवी प्रकार घडला. याठिकाणी गजानन मडवी यांचे घर जमिनीखाली गाडले गेले.
एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकली याचा प्रत्यक्ष अनुभव चंद्रपुरातील गजानन मडवी यांना आला आहे. त्यांचे अख्ख घर जमिनीत गाडले गेले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह याठिकाणी पाहणी केली.
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेत मडवी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर हे जमिनीत पडलेल्या खड्ड्यात गेले. या घटनेनंतर परिसरातील आसपासची घरेही खाली करण्याचे आदेश प्रशासनाने नागरिकांना दिले. या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
या घटनेनंतर बघ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. याबाबत वेकोलीचे वणी विभागाचे मुख्य प्रहाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनाही माहिती देण्यात आली.
गजानन मडवी यांच्या घरातील सदस्य घरात बसले असताना अचानक हादरे बसायला सुरुवात झाली त्यामुळे कुटुंबातील सगळे घराबाहेर धावत आले. परिसरातील लोकांनाही काही कळालं नाही. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच घर कोसळलं आणि खड्ड्यात गेले.
मडवी यांच्या घरात जवळपास ७० फूट खड्डा पडला त्यामुळे परिसरात लोकांमध्ये दहशत माजली. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप कुणालाही माहिती नाही. परंतु परिसरातील कोळसा खाणीमुळे घर जमीनदोस्त झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
घुग्सुस परिसरात आसपास भूमिगत कोळसा खाणी आहेत. त्यामुळे मडवी यांच्या घराजवळ ७० फूट खड्डा पडल्याचं लोक सांगतात. संध्याकाळी मडवी यांच्या घरातील लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या दिनक्रमात व्यस्त होते. तेव्हा अचानक हादरे बसण्यास सुरुवात झाली. तेव्हा भीतीपोटी सगळेच घराबाहेर पडले.
या घटनेनंतर खासदार बाळू धानोरकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. परिसरातील नागरिकांना शासकीय आवास योजनेतून पक्के घर निर्माण करण्यात यावे. घुग्घुस शहरातील या घटना भूमिगत सुरु असलेल्या कोळसा खदानीमुळे घडत असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमराईतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती पसरली आहे. सध्या प्रशासनाकडून मडवी यांच्या घराशेजारील असलेली घरे रिकामी करण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेत. घर निर्माण होईपर्यंत नागरिकांना वेकोलीतील क्वॉर्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी खासदारांनी केलीय.