शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 01:01 PM2022-07-24T13:01:13+5:302022-07-24T13:04:24+5:30

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदारांनी पक्षात बंड केले आहे. शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी जुळवून घेत सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट तर शिंदेंचा दुसरा गट. आमदार, खासदार यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. त्यात पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकारी राजू विटकर यांचा समावेश होता.

परंतु शिंदे गटातून पुन्हा मूळ शिवसेनेत परत येणारे राजू विटकर हे पहिले शिवसैनिक ठरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागत त्यांनी पुन्हा पक्षात जोमाने काम करू असं वचन विटकर यांनी पत्राद्वारे केले आहे.

राजू विटकर म्हणाले की, मी ३२-३३ वर्ष शिवसेनेत काम करत होतो. मला २-३ वेळा तिकीट दिले होते. रोजच्या बातम्या बघून बघून पक्षप्रवेश चालले होते. तेव्हा मलाही एकनाथ शिंदे यांना भेटावं आणि काही गोष्टी बोलाव्या असं वाटलं. मी मुंबईत गेलो, मेळाव्यात सहभागी झालो. मुख्यमंत्री शिंदे यांनीही माझं नाव घेतले. मला आनंद झाला असं त्यांनी सांगितले.

त्यानंतर मुंबईतून मी पुण्यासाठी निघालो, मध्यरात्री दीड पावणे दोन वाजता घरी आलो. घरच्यांनी विचारलं तेव्हा मी सगळं सांगितले. परंतु माझ्या घरच्यांना ते पटलं नाही. पक्षासोबत मी असं नको करायला हवं कुटुंबातील सदस्य म्हणाले.

त्यानंतर मी टीव्ही लावली तर त्यावर आदित्य ठाकरेंची रॅली पाहिली, काही वयस्कर शिवसैनिक रडत होते, दिव्यांग होते पत्र लिहिले होते. हे सगळं पाहून मी भावनिक झालो. त्यातून माझे विचार बदलले. आपण फार मोठी चूक करतोय हे लक्षात आले असं राजू विटकरांनी सांगितले.

या परिस्थितीत पक्षासोबत राहणे गरजेचे आहे. शिवसेना या चार शब्दाने मला ओळख दिली. त्यामुळे पक्षाचं नाव जपणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं असं विटकर म्हणाले. त्यानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राजू विटकर यांची भेट घेतली.

गोऱ्हे यांनी त्यांच्या वाहनातून भगवे उपरणं काढून राजू विटकर यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला. राजू विटकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात स्वत:ची चूक मान्य करत मला पुन्हा पक्षात घ्यावं अशी विनंती केली.

मी दोनदा महापालिकेच्या निवडणुकीत उभं राहिलो. मी इतका मोठा कार्यकर्ता नाही. मी देवाला साकडं घालतो. काही तरी चमत्कार घडव एकच शिवसेना राहील. पक्षात फूट पडणार नाही. एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेसोबत एकत्र यावं, एकत्र काम करूया असं आवाहन शिवसैनिक राजू विटकर यांनी केले.

शिवसैनिकांचा विचार करावा, पक्षात फूट पडू नये. एकनाथ शिंदेंना फोन करून पुन्हा येण्याचं आवाहन करा. कदाचित तुमच्या फोनची ते वाट पाहत असतील. ज्याला आम्ही मारतो, जो आमच्यावर हल्ला करतोय दोन्ही शिवसैनिक आहोत. शिवसैनिकाचे मरण यात होतंय. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं त्यांनी सांगितले.