Aditya Thackeray: नजरेला नजर...रोखठोक भाषा अन् नैतिकतेची परीक्षा; आदित्य ठाकरे तुफान बरसले! By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 02:53 PM 2022-07-03T14:53:44+5:30 2022-07-03T15:07:51+5:30
राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी सभागृहात भाषण करताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली. भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. यावेळी नार्वेकरांच्या निवडीबाबत अभिनंदन प्रस्तावाच्या निमित्तानं विविध नेत्यांची भाषणं झालं. यावेळी आदित्य ठाकरे विधानसभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
आदित्य ठाकरेंनी आज विधानभवन परिसरात दाखल होताच बंडखोर आमदारांवर शरसंधान करण्यास सुरुवात करत आपला इरादा स्पष्ट केला. अजमल कसाबला देखील इतक्या सुरक्षा व्यवस्थेत आणलं गेलं नव्हतं. सुरक्षा व्यवस्थेत आमदारांना आणायला ते काय अतिरेकी आहेत का?, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर हल्ला केला.
आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात देखील बंडखोरी केल्यामुळे सरकार गेल्याचा उल्लेख करत जर फडणवीसांनी अडीच वर्षाआधीच आम्ही सांगितलेलं ऐकलं असतं तर आजची परिस्थिती कदाचित तेव्हा पाहायला मिळाली असती आणि आज ते मुख्यमंत्री असते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.
विधानसभा अधिवेशनाचं आजचं कामकाज थांबल्यानंतरही आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडखोरांवर हल्लाबोल केला. "शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आज सभागृहात माझ्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत केली नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"बंडखोर आज नजर चोरुन विधानसभेत बसले होते. त्यांची डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत झाली नाही. मग हेच आमदार जेव्हा त्यांच्या मतदार संघात जातील तेव्हा काय करतील? शिवसैनिकांशी कसे बोलतील?", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
बंडखोर आमदारांवर जो कोट्यवधींचा खर्च केला गेला त्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बंडखोरांना सूरत, गुवाहाटी व्हाया गोवाला नेण्यासाठी, मग इथं आणण्यासाठी जो खर्च झाला. तो कुठून आला असेल बरं?, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी खोचक टोला बंडखोरांना लगावला.
आज सभागृहात राहुल नार्वेकर निवडून आले असले तरी नैतिकतेच्या चाचणीत बंडखोर नापास झाले आहेत. बंडखोरांची डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत झाली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही आमचा व्हिप आधीच उपाध्यक्षांकडे दिला होता. त्याची नोंदही कामकाजात झाली आहे. त्यांनी तो मान्यही केला आहे. त्यामुळे याचा निर्णय आता कोर्टातच होईल. पण नैतिकतेच्या चाचणीत बंडखोर नापास झालेत एवढं नक्की, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभेतील शिवसेनेचं कार्यालय सील केल्याच्या वृत्तावर बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी आम्हीच आमचं कार्यालय सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडे आहे, असं वक्तव्य केलं. तसंच "आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका. आरेचं जंगल मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरेला देखील दोन पर्याय आहेत, एक कांजूरमार्ग आणि दुसरा पहाडी गोरेगाव. मुंबईकरांचा, आमच्या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे" असं देखील आरे कारशेडचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.