ऑनलाइन लोकमत - मुंबई, दि. 12 - सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं. पहाटे 5 वाजता मध्य रेल्वेच्या संतप्त प्रवाशांनी आंदोलनास सुरुवात केली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, प्रवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच प्रवाशांनी सकाळी 11 च्या सुमारास पहिली रेल्वे मुंबईकडे सोडली. संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकात लोकल अडवल्याने अगोदरच विस्कळीत झालेल्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. बदलापूरकरांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे आता दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह इतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आली. यामुळे बदलापूरमधील संतप्त प्रवाशांनी स्टेशनवरच लोकल रोखली, आणि स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. गाडी वेळेवर येईल असं लिहून देण्याची मागणी प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे केली आहे. संतप्त प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी लोकलही रोखली असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. (छायाचित्र - महेश मोरे) दरम्यान प्रवाशांनी लोकलच्या केबिनचा ताबा घेतला आहे. प्रवाशांचा उद्रेक पाहून सीएसटी - कर्जत गाडीचा मोटरमनही पळून गेला आहे. प्रवाशांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून बदलापूर पोलीस स्थानकावर पोहोचले आहे. गेल्या तीन तासांपासून मध्य रेल्वे लोकल सेवेवर परिणाम झाला असल्याचं दिसत आहे. एक्स्प्रेस सेवचाही झाला खोळंबादरम्यान बदलापूर स्टेशनवर झालेल्या रेलरोकोमुळे एक्स्प्रेस सेवेचाही खोळंबा झाला आहे. महालक्ष्मी, सिद्धेश्वर, इंद्रायणी या एक्स्प्रेस स्टेशनवर थांबवण्यात आल्या असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.