लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:48 AM2024-08-28T11:48:19+5:302024-08-28T12:01:50+5:30

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपानं नवी स्ट्रॅटर्जी आणायचं ठरवलं असून त्यादृष्टीने पक्षातील नेते कामाला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. महाराष्ट्रात २२ जागा जिंकणाऱ्या भाजपाला अवघ्या ९ जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभेतील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला असून त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहेत.

भाजपानं महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत अपेक्षा कमी केल्या आहेत. राज्यात १०० जागा जिंकणे लक्ष्य ठेवलं आहे. २८८ सदस्यांपैकी भाजपाकडे सध्या १०६ सदस्य आहेत. त्यात सहकारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा गाठण्याची भाजपाला आशा वाटते.

मागील आठवड्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल त्यात काही शंका नाही परंतु त्यासाठी आपल्याला किमान १०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवले पाहिजे. जर आपण १०० चा आकडा पार केला तर भाजपाशिवाय कुणी सरकार बनवू शकणार नाही असं त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फक्त ०.३ टक्के अंतर होतं. मतांमध्ये बोलायचे झाले तर महायुती आणि मविआत २ लाखांच्या मतांचा फरक असल्याचं वारंवार फडणवीस जोर देत आहेत. हे अंतर सहजपणे लाडकी बहिण योजनेमुळे कमी होण्याचा दावा फडणवीसांनी बैठकीत केला.

त्याशिवाय लोकसभेत अबकी बार ४०० पार नारा चालला नाही. महाराष्ट्रातही आम्ही ४८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकू असं म्हटलं परंतु त्याचा उलटा परिणाम झाला. उच्चस्तरीय अभियान आणि अंदाज यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी राज्यभरात प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पक्षाचा यापुढे राहील. ग्राऊंडवर मतदारांशी झालेला दुरावा हे लोकसभेतील अपयशाचं कारण असल्याचं भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

विधानसभेच्या स्ट्रॅटर्जीअंतर्गत भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. फडणवीस यांनी नागपूरात आरएसएस मुख्यालयात आतापर्यंत कमीत कमी ४ बैठका घेतल्यात. राज्यात भाजपाचे ३५ लाख सक्रीय कार्यकर्ते आहेत परंतु निवडणूक जिंकण्यासाठी तेवढे पुरेसे नाहीत त्यासाठी आरएसएसची मदत भाजपाला हवी असं पक्ष नेतृत्वाला वाटतं.

प्रत्येक मतदारसंघात भाजपा आणि मित्रपक्षांसोबत समन्वय साधण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकाची नियुक्ती केली जाणार आहे. संघातील कॅडर महायुती सरकारच्या प्रमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करतील.

त्याशिवाय सर्व हिंदू संघटनांशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय साधला जाणार आहे. सकल हिंदू समाजसारख्या संघटनांनी बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराविरोधात राज्यभरात रस्त्यावर येऊन आंदोलन केले. लव आणि लँड जिहादसारखे मुद्देही पुढे आणण्याचा प्रयत्न असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसनं बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत संघ आणि भाजपा यांच्यात झालेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निकालानंतर भाजपाच्या सुमार कामगिरीवरून दोघांमधील मतभेद पुढे आले होते. भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी संघावर केलेल्या विधानामुळे नाराजी पसरली होती. भाजपा स्वत:ला चालवण्यासाठी सक्षम आहे त्यांना आरएसएसची पहिल्यासारखी गरज नाही असं नड्डा म्हणाले होते.

जुलै महिन्यात आरएसएसच्या पत्रिकेत अजित पवारांना महायुतीत घेण्यानं महायुतीला पराभव पत्करावा लागला असं छापून आले होते. भाजपाच्या कारभारावर संघाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्यात भाजपाजवळ २०२१ पासून एकही संघटन महासचिव नाही. हे पद आरएसएस प्रचारक आणि पक्षातील समन्वयाचे काम करते.