Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट? देशात सर्वाधिक रुग्ण राज्यात, त्यापाठोपाठ.... By प्रविण मरगळे | Published: February 22, 2021 05:28 PM 2021-02-22T17:28:01+5:30 2021-02-22T17:32:04+5:30
Corona Patient Increase in Maharashtra: राज्यात गेल्या सात दिवसांपासून कोरोना(Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र, केरळसह देशातील ५ राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने देशात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे, महाराष्ट्रात कोरोना सर्वात वेगाने पसरत आहे, महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशासमोर कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिले आहे.
भारतात मागील ७ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात १५ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत, मागील ५ आठवड्यापासून पहिल्यांदाच एवढी मोठी आकडेवारी समोर आली आहे.
पहिल्या आठवड्यात कोरोनाचे ७७ हजार २८४ रुग्ण आढळले होते, त्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ३४ टक्क्यांनी वाढली आहे, ज्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आलीय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे, ज्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे, देशात सध्या सक्रीय कोरोना रुग्णांमध्ये ७४ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत. त्याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही कोरोना रुग्ण वाढले आहेत.
महाराष्ट्रात रविवारी ६ हजार ९७१ कोरोना रुग्ण आढळले, त्यानंतर राज्यातील आकडा २१ लाखांच्या पार गेला, सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ६ हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळले आहे, तीन महिन्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदा महाराष्ट्रात ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले.
याचप्रकारे केरळमध्ये ४ हजार, पंजाबमध्ये ३५८ आणि मध्य प्रदेशातत २९९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. अनेक शहराची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होत असून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता नाशिकमध्ये रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे; तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे.
मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधासाठी नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार आहेत, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार. आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याची माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
दरम्यान, समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे, म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला, मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही, लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.