Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:57 PM2024-10-13T12:57:56+5:302024-10-13T13:23:09+5:30

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडटे समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.

काल रात्री सिद्दिकी यांची हत्या झाली. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही या टोळीतील सदस्याची असल्याची माहिती मिळत आहे. या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबांच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते.

लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये "ओम जय श्री राम, जय भारत" असे म्हटले आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "मला जीवनाचे सार समजते, मी शरीर आणि संपत्तीला धूळ समजतो. मी जे केले ते चांगले काम होते, मी जे केले ते मैत्रीचा धर्म आहे."

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तुम्ही आमच्या भावाचे नुकसान केले. आज बाबा सिद्दिकीच्या शालीनतेचे पूल बांधले जात आहेत एकेकाळी ते दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होते. मृत्यूचे कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे.

"आमचे कोणाशीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करेल, तुमचा हिशोब करुन ठेवा. आमच्या भावांपैकी कोणाला मारले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आम्ही कधीही पहिला हल्ला केला नाही. जय श्री राम जय भारत. सलाम शहीदं नू.", असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत तीन शूटर्सची ओळख पटवली असून सूत्रधाराचा शोध सुरू आहे. टोळीचा असा दावा आहे की, बाबा सिद्दिकीची कथित शराफत एक भ्रमापेक्षा अधिक काही नाही आणि MCOCA कायद्यांतर्गत दाऊद इब्राहिमशी त्यांच्या पूर्वीच्या सहभागाचे पुरावे आहेत.

सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावाही बिश्नोई गँगने केला आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत, कारण टोळीने इशारा दिला आहे की जर कोणी त्यांच्या "भावाला" इजा केली तर ते नक्कीच प्रतिक्रिया देतील.

दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी सिद्दिकीच्या कथित जवळीकतेमुळे हे प्रकरण आता राजकीय आणि बॉलिवूड जगताशी जोडले गेले आहे.

टोळीची सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आणि सलमान खानचे चित्रपट कनेक्शन समोर येत असताना पोलिसांसमोर आता हे नवीन आव्हान आहे.