Babasaheb Purandare: स्वातंत्र्यसैनिक ते शिवशाहीर, असा होता बाबासाहेब पुरंदरेंचा जीवनप्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:18 AM 2021-11-15T10:18:23+5:30 2021-11-15T10:26:09+5:30
Babasaheb Purandare News: प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. व्याख्याने, नाटक आणि लेखनाच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. व्याख्याने, नाटक आणि लेखनाच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्यातील सासवड येथे झाला होता. पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळातून काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांनी दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हा भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. तेव्हा ज्या क्रांतिकारक तरुणांनी दादरा नगर हवेली पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी लढा पुकारला. त्यांच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेही एक होते.
इतिहास संशोधन करत असतानाच बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले जीवन शिवचरित्राच्या प्रचार प्रसारासाठी वाहून घेतले. राज्यातील विविध गडकिल्ले, ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करून त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावरील पहिले जाहीर व्याख्यान २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूरमध्ये दिले होते. तेव्हापासून त्यांच्या शिवव्याख्यानांची मालिका अव्याहतपणे सुरू होती. संपूर्ण जीवनात त्यांनी सुमारे १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिली.
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या सुमारे १७ आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाच्या आतापर्यंत सुमारे पाच लाख प्रतींची विक्री झाली आहे. याशिवाय त्यांनी इतिहासावर इतर विपुल लेखन केले.
बाबासाहेब सध्याच्या पिढीमध्ये विशेष प्रसिद्धीस आले ते जाणता राजा या महानाट्याच्या निर्मितीमुळे. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या जाणता राजा या नाट्याचे सुमारे बाराशे हजाराहून अधिक प्रयोग झाले होते. या नाट्याच्या माध्यमातून त्यांनी शिवकाळ रंगमंचावर साकार करण्याचा प्रयोग केला होता. या महानाट्याचा पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या नाटकामध्ये कलाकारांच्या मोठ्या ताफ्याबरोबरच हत्ती, घोडे यांचाही समावेश असे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता. त्यावरून मोठा वादही झाला. मात्र हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना १९ऑगस्ट २०१५ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनावर बेल भंडारा नावाचे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी लिहिले आहे.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन केला. २०१९ मध्ये बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक प्रख्यात शिवशाहीर म्हणून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील