ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - गेले 10 दिवस मुक्काम केल्यानंतर गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघाले आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली असून मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी करत असतात. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन यापुढे शास्त्रोक्त पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तराफा तयार करण्यात आला आहे. लिफ्ट पद्धतीचा तराफा तयार करण्यात आला आहे. शार्प शिपयार्ड कंपनीनं हा विशेष तराफा तयार केला आहे. त्यामुळे हा विसर्जनसोहळा अतिशय वेगळा असेल अशी आशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. छायाचित्र - दत्ता खेडेकर छायाचित्र - सुशील कदम ३,५०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटाअनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील चौपाट्यांवर होणाऱ्या गणेश विसर्जनानिमित्ताने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल ३ हजार ३६ पोलिसांचा फौजफाटा तैनात राहील, अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, सशस्त्र दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान, स्वयंसेवकांसह विद्यार्थीही वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी जागोजागी तैनात असतील.मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे आणि पवई येथे उभारण्यात आलेल्या पाच नियंत्रण कक्षांद्वारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्याद्वारे मिरवणुकांचे नियंत्रण करण्यात येणार आहे. ३,५३६ वाहतूक पोलिसांच्या मदतीला सशस्त्र पोलीस दलाचे १०० जवान, गृहरक्षक दलाचे २५० जवान, विविध स्वयंसेवी संस्थांचे सहा हजार स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनांचे ९०० विद्यार्थी, नागरी संरक्षण दलाचे १,५०० स्वयंसेवक, स्काउट अँड गाइडचे ३०० विद्यार्थी, ३९० वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे १०० शिक्षक, राष्ट्रीय छात्र सेनेचे ४०० विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५०० स्वयंसेवक, हॅम रेडिओचे ३५ स्वयंसेवक आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी असतील.