दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:49 IST2025-01-25T16:32:05+5:302025-01-25T16:49:17+5:30

२०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकारणात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मित्र बनले तर जे मित्र होते ते एकमेकांचे शत्रू बनले. मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा आला आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली.
अडीच वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंप घडले. शिवसेनेत २ गट पडले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. राज्यात भाजपा महायुतीची सत्ता आली. त्यानंतर अजित पवारांच्या रुपाने आणखी एक नेता महायुतीसोबत आला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता राज्यात आणली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला ५७ आणि ठाकरे गटाला २० जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेला शिंदे गटाचे ७ आणि ठाकरेंचे ९ खासदार निवडून गेलेत. त्यातच आता पुन्हा एकदा ठाकरेंचे शिलेदार शिंदेंच्या बाजूने जाणार का अशी चर्चा सुरू झाली.
या घडामोडीत एकनाथ शिंदेचे विश्वासू सहकारी मंत्री संजय शिरसाट यांनी नवीन दावा केला आहे. ठाकरे गटाचे खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. किती खासदार आहेत याचा आकडा शिंदेच सांगू शकतील मात्र अनेकजण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायेत असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय फक्त उबाठाची ही अवस्था नाही तर शरद पवारांच्या गटातही तेच आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. जास्तीत जास्त महिनाभरात प्रवेश होतील, ३१ तारखेला लोकसभेचं अधिवेशन सुरू होतंय त्यानंतर या घडामोडी घडतील. कदाचित अधिवेशन संपेपर्यंत याचा सोक्षमोक्ष होईल असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला.
आमदार, खासदार, माजी आमदार, पदाधिकारी जे ठाकरेंच्या जाचाला कंटाळले आहेत ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहे. २० संख्याबळ असल्याने एक गट बनवायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ते कधी मन वळवतील असं सांगू शकत नाही असं सांगत शिरसाट यांनी ठाकरेंच्या २० आमदारांच्या फुटीवर भाष्य केले.
याआधीही माजी मंत्री बच्चू कडू यांनी दावा केला होता. देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील असं म्हटलं होते.
ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे असं कडू यांनी सांगितले.
यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत गेलेले उद्धव ठाकरे आता पुढील महिन्यात पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जातायेत. यावेळी ते पक्षाचे खासदार यांची बैठक घेणार आहेत त्याशिवाय इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत असं सांगण्यात येते. मात्र ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.