प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:40 PM2024-08-23T20:40:09+5:302024-08-23T20:46:25+5:30

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहणार आहे.

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.

5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.

या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 8 सप्टेंबर रात्री 11 वाजेपासून ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता आणि 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून ते 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील.

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा.

जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात – निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.