आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 00:51 IST2025-01-02T00:45:04+5:302025-01-02T00:51:31+5:30
suresh dhas prajakta mali: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींसह प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं.

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी आणि इतर अभिनेत्रींचा उल्लेख करत ईव्हेंटबद्दल विधान केले होते.
सुरेश धस यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने माफी मागावी, अशी भूमिका घेतली होती. पण, सुरेश धस यांनी माफी मागणार नाही, असे सांगितले. पण, नंतर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली.
याबद्दलच सुरेश धस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली. माफी मागण्याच्या कारणाचा खुलासा करताना प्राजक्ताताईंच्या पायाही पडेन असे विधान केले.
सुरेश धस म्हणाले, "मी त्यांच्या ईव्हेंट मॅनेजमेंटबद्दल बोललो होतो. महिलांच्या कार्यक्रमाबद्दल बोललो नाही. आक्षेप काय होता की, त्यावेळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतकं पाणी होतं. त्यावेळी धनंजय मुंडे कृषिमंत्री होते. मराठवाड्यातील शेतकरी पाण्याखाली गेलेला असताना तुम्ही रश्मिका मंदानाचा कार्यक्रम कसा घेता? हा माझा आक्षेप होता", असे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधानावर दिले.
आधी तुम्ही म्हणालात की, माफी मागणार नाही मग नंतर का माफी मागितली? असा प्रश्न आमदार सुरेश धस यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे सरकत असेल, तर मी माफीच काय, म्हणालात, तर प्राजक्ताताईंच्या जाऊन पायाही पडतो. माझं पोट इतकं टाईट झालेलं नाही की, कोणापुढे वाकायचं नाही. मी कोणाच्याही पाया पडतो", अशी भूमिका सुरेश धस यांनी या मांडली.