तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:47 PM 2024-11-15T14:47:14+5:30 2024-11-15T14:53:03+5:30
Maharashtra Assembly Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर या विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी तीन आकडी आमदारसंख्या गाठणं कठीण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर या विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी तीन आकडी आमदारसंख्या गाठणं कठीण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सत्ताधारी महायुतीसमोर महाविकास आघाडीने कडवं आव्हान उभं केलं आहे. मात्र असलं तरी राज्यात भाजपाला पुन्हा एकदा १०० पार जागा जिंकण्याची संधी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने जुळवून आणलेली समीकरणं पक्षाला मदतगार ठरणार आहे. त्या समीकरणांचा घेतलेला हा आढावा.
विधानसभा निवडणुकीत भाजपा १४८ ते १५२ जागांवर लढत आहे. तसेच मागच्या वेळच्या जिंकलेल्या १०५ जागा कायम राखण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. भाजपाने यावेळी अनेक विद्यमान आमदार आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्यावर भर दिला आहे. त्याशिवाय उमेदवारी देताना भाजपाने इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला आहे. त्यामुळे भाजपाचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट चांगला राहण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्यास संविधान बदललं जाईल, आरक्षण रद्द केलं जाईल, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. तसेच हा आरोप अगदी प्रभावी ठरला होता. या प्रचाराचा भाजपाला जोरदार फटका बसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे फारसे प्रभावी ठरताना दिसत नाही आहे. त्यामुळे लोकसभेत काँग्रेसच्यामागे एकवटलेला दलित आणि आदिवासी समुदाय हा काही प्रमाणात भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशभरात योगी आदित्यनाथ यांनी दिलेली बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी या घोषणेचा प्रभाव दिसून येत आहे. तसेच यामुळे हिंदुत्ववादी मतांचं भाजपाच्या मागे एकत्रीकरण होण्याची शक्यता वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने विविध योजनांचा आणि घोषणांचा धडाका लावला होता. लाडकी बहीण, नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना विजबिलमाफी अशा योजनांची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामधील लाडकी बहीण योजना ही महायुती आणि भाजपासाठी गेमचेंजर ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाने विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा फारसा लांबवला नाही. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात खेचाखेची सुरू होती. या बाबी भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे या विधानसभेत भाजपा पुन्हा एकदा १०० पार मजल मारून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.