जनावरांमध्येही वाढतोय कर्करोग; काय आहेत लक्षणे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:23 IST2025-02-07T15:14:26+5:302025-02-07T15:23:58+5:30

सद्यस्थितीत अनेक वेळा वातावरणातील प्रदूषणामुळे जनावरांना श्वासोच्छ्रास घ्यायलाही त्रास होतो, त्याचीही नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

अलिकडच्या काळात माणसांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. तसेच आता जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी उपाययोजना असून वेळीच उपचार केला तर तो बरा होऊ शकतो, असं पशूसंवर्धन अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कुत्र्यांनाही व्हिनरल ग्लॅमोरिया हा कॅन्सर होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाने तो कॅन्सर बरा होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

ज्यांच्याकडे जनावरे आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपल्या पशुंची नियमित तपासणी करून घेण्याची गरज आहे. त्यांना निरोगी आहार द्यावा. नियमित पाणी सेवन दिले तर त्यांच्या आजारांचेही प्रमाण घटू शकेल. विशेषतः त्यांचे प्रदूषणापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत अनेक वेळा वातावरणातील प्रदूषणामुळे जनावरांना श्वासोच्छ्रास घ्यायलाही त्रास होतो, त्याचीही नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगांना रंग लावू नये. शिंगे साळू नये. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. डोळ्यांचा कॅन्सर होऊ शकतो. पापण्यांना त्रास होत असेल तर उपचार होऊ शकतात. पण आत पेशी गेल्यास शस्त्रक्रियाच करावी लागते.- डॉ. अनंत साखरे, सहायक आयुक्त, पशु संवर्धन विभाग

कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार- १. बिनिग्न कॅन्सर-हळूहळू वाढणारा हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरत नाही. याला शस्त्रक्रियेने काढता येतो आणि त्यानंतर होण्याची शक्यता कमी असते. २. मॅलिग्नंट कॅन्सर-जलद गतीने वाढणारा आणि शरीराच्या इतर भागात पसरणारा कर्करोग. याचा धोका गंभीर असतो आणि त्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचारांची आवश्यकता असते.

काय आहेत लक्षणे? गाठी किंवा सूज, वजन कमी करणे, कमी खाणे-पिणे, काम करण्याची शक्ती कमी होणे, थकवा येतो. जनावरांमध्ये शिंगाचा आकार कमी कमी होत जातो, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जाणवतो.

शिंगाचा कॅन्सर- जनावरांमध्ये बैलांना, गाईंना शिंगाचा कॅन्सर होऊ शकतो. यात त्वचा कॅन्सर, स्तन ग्रंथी (गाई, म्हशी, कुत्री), हाडाचा कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर अशा वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो.