Coronavirus: राज्यात नाईट कर्फ्यू? लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; कोरोनामुळे ठाकरे सरकार अलर्टवर By प्रविण मरगळे | Published: February 21, 2021 03:45 PM 2021-02-21T15:45:58+5:30 2021-02-21T15:53:04+5:30
Corona Patient increase in Maharashtra, Again Lockdown in State: राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, अशातच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे असे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने दिले आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, शनिवारी मुंबईत ८९७ रुग्ण आढळले, मागील ११ दिवसांत सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ६०८ ने वाढली आहे, राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार अलर्टवर आलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यात हे प्रमाण १० टक्के इतके आहे, पुण्यात वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे काही भाग कन्टेंन्मेंट झोन जाहीर केलेत, कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे लोकांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या अचानक कमी झाली आहे, कोरोनामुळे राष्ट्रवादी मंत्र्यांचे जनता दरबार पुढील २ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. या काळात लोकांना ईमेलद्वारे तक्रारी आणि समस्या मांडण्याचं आवाहन केले आहे.
मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी बीएमसीने सुरू केली आहे. बीएमसीने कोरोना चाचणी वाढवली असून गुजरात, राजस्थान, दिल्ली गोवा आणि केरळहून मुंबईत येणाऱ्या लोकांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेज येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, हे नवे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत.
पुण्यात वाढते कोरोना रूग्ण पाहता नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असेल. पुण्यात शनिवारी एका दिवसात ८४९ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकार विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.
जर लोकांनी स्वत: आपल्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर राज्य सरकारला पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. सरकार सर्व पातळीवर उपाययोजना करत आहे, विशेषत: संध्याकाळी ५ पासून होणारी गर्दी टाळण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सरकार करत आहे अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
९ फेब्रुवारीला मुंबईत ५ हजार २९२ सक्रीय रुग्ण होते, त्यांची संख्या २० फेब्रुवारीला ६ हजार ९०० इतकी झाली आहे. शनिवारी राज्यात ६ हजार २८१ रुग्ण आढळले तर ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसाला २० हजार लोकांची कोरोना चाचणी होत आहे.
राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ सक्रीय रुग्ण आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून परिस्थितीतीबाबत माहिती देणार आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी कुठली नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.