गरजू मजुरांसाठी शिक्षक झाले स्वयंपाकी; कोरोनाच्या संकटात देताहेत मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 08:59 PM2020-04-17T20:59:28+5:302020-04-17T21:04:22+5:30

कोरोनामुळे अनेक स्थलांतरित मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या या संकटसमयी शिक्षक माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः स्वयंपाक तयार करून या निराश्रितांना मायेचे दोन घास भरवण्याचे काम करीत आहेत.

वर्धा जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचा आकडा आठ हजाराच्या पुढे गेला आहे. त्यांची सोय प्रशासन , स्वयंसेवी संघटना आणि कंपन्यांच्या सहकार्याने विविध निवारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचा प्रश्न उद्भवल्यावर राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवाराने ही जबाबदारी घेत प्रशासनाला सहकार्य केले.

प्रशासनाने नवजीवन छात्रालय उपलब्ध करून दिल्यावर प्राथमिक शिक्षकांनी या मजुरांसाठी स्वतः वर्गणी गोळा करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

विशेष म्हणजे शिक्षक मंडळी स्वतः स्वयंपाक करून त्यांना गरम जेवू घालतात. मजुरांना सकाळी चहा, पोहे, दुपारी वरणभात, भाजी, चपाती तसेच रात्रीचे जेवण देण्यात येते. या जेवणाबद्दल मजुरांच्या कोणताही किंतु-परंतु राहू नये म्हणून शिक्षक स्वतःही त्यांच्यासोबत जेवण करतात.

या सर्व मजुरांना कपडे, अंघोळीचा साबण, केश तेल व दंतमंजनही देण्यात आले आहे.

पालकमंत्री सुनील केदार यांनीदेखील शिक्षकांच्या या सेवेचे कौतुक केले आहे.

आम्ही शिक्षकांनी सुरुवातीला धान्य व किराणा अशा 150 किटचे वाटप केले. पण या मजुरांचा प्रश्न समजल्यावर आम्ही लागलीच या कामाला होकार दिल्याचे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय कोंबे यांनी सांगितले. यानिमित्ताने भुकेल्यांची सेवा करण्याची संधी शिक्षकांना मिळाल्याचंदेखील ते म्हणाले.

सुरुवातीला आमच्याकडे 21 हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर केवळ आठ दिवसात खात्यात 4 लाख रुपये जमा झाले आहेत. या निधीच्या जोरावर सेवेचे व्रत आम्ही पुढील किमान महिनाभर चालवू शकतो, अशी माहिती कोंबे यांनी दिली.

याठिकाणी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची दक्षता घेण्यात आली असून आळीपाळीने सर्व शिक्षक ही जबाबदारी सांभाळत आहेत.

आमच्या या सेवेमुळे शिक्षकांवरचे अनेक आरोप बंद होतील अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.