महाराष्ट्रात महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात; कोल्हापुरातील पुरुषांचे मदतीसाठी सर्वात जास्त कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:53 IST2025-04-03T17:39:02+5:302025-04-03T17:53:38+5:30
पुरुष व्यक्त होत नाही किंवा स्वतःच्या मनातील घालमेल सांगत नाही. यामुळे राज्यात महिलांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुरुषांच्या नैराश्याचे प्रमाण वाढलं आहे.

मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरु केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनची आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पुरुष महिलांपेक्षा अधिक नैराश्यात असल्याचे समोर आलं आहे.
टेलिमानसच्या हेल्पलाईन मदतीसाठी येणारे कॉल हे महिलांपेक्षा दुप्पट पुरुषांचे असल्याचे समोर आलं आहे.
राज्यात मदतीसाठी टेलिमानसच्या हेल्पलाईन ६७.९९ टक्के कॉल पुरुषांचे असून ३१. ५० टक्के कॉल हे महिलांचे असल्याचे समोर आलं आहे. ०.०१२ टक्का पारलिंगी व्यक्तींनीही या संपर्क केलेल्यांमध्ये समावेश आहे.
'टेलिमानस' या हेल्पलाइनवर मदतीसाठी आलेल्या कॉल्सपैकी ७१ टक्के कॉल हे १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींचे आहेत. तर ४६ ते ६४ टक्के वयोगटातील १६.४ टक्के लोकांनी मदतीसाठी संपर्क साधला.
यापैकी १० पैकी सात पुरुषांनी तर तीन महिलांनी मानसिक आरोग्यासंदर्भात मदत मागितली आहे. नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावं याबाबत विचारणा करण्यासाठी फोन करण्यात आले आहेत.
कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी या प्रकरणाची संख्या यामध्ये सर्वाधिक वाढलेली दिसून येत आहे.
चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येत असल्याचे सांगण्यात आलं आहे.
नैराश्येसंदर्भातील समुपदेशनासाठी सर्वाधिक कॉल हे कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत. तर मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर असून पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आत्तापर्यंत राज्यभरातून १ लाख ४५ हजार ४३१ फोन टेलिमानस आले आहेत. त्यापैकी ८५ हजार ६५० कॉल पैकी ८७.८६ टक्के व्यक्तींनी मदतीसाठी विचारणा केली. तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ०.९७३ टक्के व्यक्तींनी फोन केल्याचं समोर आलं आहे.