देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? मोदी भेटीनंतर दिल्लीत चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:15 AM2024-07-30T11:15:40+5:302024-07-30T11:22:20+5:30

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीनंतर खुद्द फडणवीसांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांना राज्य अपेक्षित होते...खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते दुसरे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात आहे. एक नेता एक पद या धोरणानुसार सध्या भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे मोदींच्या मंत्रिमंडळातही मंत्री आहेत. यामुळे त्यांच्या जागी कोण येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावांवर चर्चा केली जात आहे. अशातच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे. खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते दुसरे अध्यक्ष असणार आहेत.

नड्डा आरोग्य मंत्री झाले आहेत. यामुळे सर्व चर्चा, शक्यतांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर येत आहे. फडणवीस यांनी सपत्नीक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित विजय मिळाला नाही म्हणून फडणवीस यांनी सत्ताकेंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याची मागणी केली होती.

यावेळी फडणवीस यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती. परंतू, केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडण्याची गरज नसल्याचे समजावत फडणवीस यांना त्यांची भुमिका मागे घेण्यास लावली होती. भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असल्याची बातमी दी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री, ते राज्यातील गेलेली सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यावरून भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा फिट आणि योग्य उमेदवार मानले जात आहेत. याचे आणखी एक कारण म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदींसोबत चांगले संबंध हे देखील मानले जात आहे.

फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवाय फडणवीस संघााचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात आरएसएस आणि भाजपात अध्यक्ष पदावरून मतभेद होते. एवढ्या महत्वाच्या पदावरील व्यक्ती ही आरएसएसच्या जवळचीही हवी असे संघाला वाचत होते. नड्डा यांनी जरी भाजप आता स्वतंत्र असल्याचे म्हटले असले तरी देखील ती आरएसएसच्या नाण्याची एक बाजू आहे.

यामुळे फडणवीस हेच राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मतभेदांमुळे अध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्यात वेळ लागत होता. फडणवीसांच्या नावावर दोन्ही गट सहमत होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी-फडणवीस यांची भेट महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

नागपूर आणि महाराष्ट्रातून यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. फडणवीसांनीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात होती. यामुळे फडणवीसांना अध्यक्ष केले तर अनेक फायदे भाजप पक्ष श्रेष्ठींना दिसत आहेत.

फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये रोष आहे. लोकसभेला याच वातावरणामुळे फटका बसला होता. फडणवीसांनाच जर केंद्रात घेतले तर हा रोष कैकपटींनी कमी करता येणार आहे. फडणवीसांची ब्राम्हण जात, वरिष्ठ नेतृत्वाशी चांगले संबंध त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लाँच करण्यासाठी पुरेसे आहेत. फडणवीसांपूर्वी महाराष्ट्रातूनच विनोद तावडेंचे नाव चर्चेत आले होते. यानंतर सुनील बन्सल यांचेही नाव चर्चेत आले होते. या सर्वांमध्ये फडणवीसांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे.