शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:58 PM2024-11-19T16:58:55+5:302024-11-19T17:05:33+5:30

plot measurement : जमीन मोजणीच्या प्रकारानुसार शेतकऱ्याला शुल्क भरावे लागत होते. मात्र आता या मोजणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात शासनाकडून काहीअंशी वाढ करण्यात आली आहे.

सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न अनेकदा शेतकऱ्यांना पडतो. त्यामुळे ही शंका दूर करण्यासाठी शेतकरी शेतजमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करतात. कोणी नियमित मोजणीसाठी अर्ज करतो तर कोणी जलदगती मोजणीसाठी. जमीन मोजणीच्या प्रकारानुसार शेतकऱ्याला शुल्क भरावे लागत होते. मात्र आता या मोजणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात शासनाकडून काहीअंशी वाढ करण्यात आली आहे.

शेतजमीन, प्लॉट मोजणीचे अधिकार भूमी अभिलेख विभागाला आहेत. या विभागाकडे मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

पूर्वी साधी, नियमित व जलद व अती जलद असे मोजणीचे चार प्रकार होते. मात्र आता नियमित व जलदगती या दोनच प्रकारात मोजणी केली जाते.

दोन हेक्टरपर्यंत भूखंडांच्या नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये तर जलदगती मोजणीसाठी आठ हजार शुल्क भरावे लागते.

एक सर्व्हे नंबर, गट नंबर, पोट हिस्से, प्लॉट, मंजूर रेखांकनासाठी एक हेक्टरपर्यंत जमीन मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क वेगवेगळे आहे. मोजणी साधी असल्यास तीन हजार तर जलदगतीसाठी बारा हजार रुपये शुल्क भरावे लागते.

मनपा, नगरपालिका क्षेत्रातील जमीन मोजणी करावयाची झाल्यास साध्या मोजणीसाठी तीन हजार तर जलदगती मोजणीसाठी बारा हजार रुपये शुल्क द्यावे लागते.

शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी शुल्काचे चलन किंवा पावती, तीन महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रे लागतात. शेतजमिनीव्यतिरिक्त घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असल्यास तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.