ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान त्यांचा मुलगा चक्कर येऊन कोसळला. राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टीला उष्णता आणि अशक्तपणामुळे चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. मांटुग्यातील फाईव्ह गार्डन परिसरा त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाला त्रास झाला असला तरी ही आत्मक्लेश यात्रा थांबवण्यात येणार नसल्याचं शेट्टींनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांनाही यात्रेदरम्यान त्रास झाला होता. डॉक्टरांनी त्यांना यात्रा थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मक्लेश यात्रा थांबवणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. (राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेमुळे वाहतूक कोंडी, मुंबईकरांना "क्लेश")दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत दाखल झाली. या यात्रेमुळे पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडीमुळे मानखुर्दपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य मुंबईकर हैराण झाले होते. आत्मक्लेश यात्रेमागील नेमकं कारण काय ? ‘अच्छे दिन’ येतील म्हणून भुलून आम्ही भाजपवाल्यांच्या मागे गेलो; परंतु प्रत्यक्षात आमच्या वाट्याला कडकडीत ऊनच आले. सरकार जर आमच्या प्रश्नांना न्याय देणार नसेल तर ते उलथवून टाकण्याची ताकद चळवळीत आहे, असा सज्जड इशारा देत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा व प्रतिटनास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा; अन्यथा पुण्यातून हजारो शेतकरी चालत मुंबईला राजभवनवर धडक देऊन आत्मक्लेश आंदोलन करतील, असे शेट्टी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार 22 मेपासून या यात्रेला सुरुवात झाली. (पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना फसवले -राजू शेट्टी) लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या आश्वासनांना भुलून आम्ही त्यांना साथ दिली, परंतु मोदींनी आश्वासनांची पूर्तता केली नाही. देशभरातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या करत असून, तीन वर्षांत आत्महत्या रोखण्याऐवजी त्यावर थापेबाजीचा उतारा दिला आहे. सरकारला सत्तेचा माज आला असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली असून, या सरकारचे पाय खेचल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा दिला आहे. आत्मक्लेश यात्रेनिमित्त नवी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही यांना साथ दिली. गावा-गावांमध्ये जाऊन मते मागितली, पण आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. भाजपा सरकारने तीन वर्षांमध्ये फक्त भाषणे व आश्वासने दिली. मोदी शेतकऱ्यांचे भले करतील, असे वाटले होते, परंतु त्यांच्या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागत आहे. मोदींना शेतीविषयी काही कळत नाही किंवा कळत असून, जाणीवपूर्वक ते शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची खात्री वाटू लागली आहे. यांच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले. आत्महत्यांची संख्या वाढली असल्याची टीकाही त्यांनी केली.भांडवलदारांना कर्जमुक्ती दिली जात आहे, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास विरोध दर्शविला जात आहे. बँकांची कर्र्जे थकविणाऱ्या उद्योजकांची नावे जाहीर केली जात नाहीत, पण वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरांचा जाहीर लिलाव केला जात आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर सरकारचे पाय ओढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.