"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा" By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:54 PM 2023-09-05T20:54:51+5:30 2023-09-05T21:01:27+5:30
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत.
राज्य शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. आणखी वेळ कशाला पाहिजे. समितीचा अहवाल आला असेल तर तुम्हाला आणखी चार दिवस देतो. चार दिवसांनी मराठा समाजाला आरक्षण द्या.
पण आरक्षण दिल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली. चार दिवसानंतर अन्न, पाणी बंद करणार हे ही स्पष्ट सांगत असल्याचे जरांगे म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे सोमवारी सायंकाळी शासनाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा करीत त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, संदीपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे आदींची उपस्थिती होती.
शासनाने एक महिन्याची वेळ मागितल्याचे शिष्टमंडळाने सांगताच मनोज जरांगे यांनी त्यास नकार देत काहीही करा आरक्षण द्या तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.
आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू, असे म्हणत राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह, मंत्री गिरीश महाजन, अर्जून खोतकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. मी समाजाला शब्द दिलेला आहे, एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, किंवा मराठा आरक्षणाची यात्रा निघंल, अशा शब्दात राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर आपली त्यांनी भूमिका मांडली.
यावेळी, गिरीश महाजन यांनी उदयनराजे भोसलेंसोबतही फोनवर संवाद झाल्याचं सांगितलं. उदयनराजे भोसलेंसोबत फोनवर संवाद झाल्याचं मोबाईल काढून महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना दाखवलं. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत.
हात जोडून त्यांनी शिष्टमंडळाला मी सलाईन घेतो, पाणी पितो पण मागण्या मान्य होईपर्यंत माझं उपोषण सुरूच राहिल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.