Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत? By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 04:19 PM 2022-10-07T16:19:53+5:30 2022-10-07T16:41:23+5:30
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरीची पोटनिवडणूक लढवायची की नाही, शिंदे गट मोठ्या पेचात. धनुष्यबाण अद्याप ठाकरेंकडेच, मग उमेदवार कसा देणार? पुन्हा तोच पेच. त्यापेक्षा... अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. १४ ऑक्टोबरपर्यंत या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, तर ३ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी सातच दिवस शिल्लक असल्याने ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपाकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. परंतू, एकनाथ शिंदे गटाने अद्याप याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.
अंधेरीची जागा ही शिवसेनेची होती. त्यावर शिवसेनेचे आमदारच रमेश लटके निवडून आले होते. यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला निवडणुकीला उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना शिंदे गट या जागेवर लढणार की नाही हे अद्याप समजलेले नाही. या जागेवर भाजपा आपला उमेदवार देणार आहे. यामुळे शिंदे गट आपला छुपा पाठिंबा भाजपाला देण्याची शक्यता आहे. शिंदे गट या निवडणुकीत का लढणार नाहीत, याची काही कारणे समोर आली आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीनंतर लगेचच मुंबई महापालिका निवडणूक लागणार आहे. याचबरोबर ठाण्याची आणि पुण्याची निवडणुकही असेल. जर शिंदे गटाने विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढविली तर त्याचा वेगळा संदेश मुंबईतील मतदारांमध्ये जाऊ शकतो. याची सहानुभूती ठाकरे गटाला जाऊ शकते. याचा उलट परिणाम होऊन महापालिका निवडणुकीत देखील फटका बसू शकतो. दसरा मेळावा, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचे हे प्रश्न वेगळे आणि अंधेरीची पोटनिवडणूक वेगळी असे हे प्रकरण आहे.
दुसरी बाब म्हणजे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढावे लागणार आहे. शिंदे गटाने तातडीने हे निवडणूक चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती. असे झाले नाही तर ठाकरेंची शिवसेना धनुष्यबाणावर अर्ज दाखल करेल, लढेलही. परंतू, शिंदे गट कोणत्या अधिकाराने शिवसेनेचा एबी फॉ़र्म देणार आणि निवडणूक चिन्ह ठेवणार असा प्रश्न पुन्हा आलाच, जो सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे पेंडिंग आहे.
भाजपा का सोईचा... एखाद्या आमदाराचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणण्याचा प्रघात आहे. परंतू, पंढरपूर आणि कोल्हापूरमधील मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपाने विरोधात लढविली होती. यापैकी पंढरपूरची निवडणूक जिंकली तर कोल्हापूरची हरली होती. यामुळे शिवसेनेला विरोध म्हणून भाजपा इथेही पोटनिवडणूक लढविल्यास जनतेत शिंदे गटविरोधात संदेश जाणार नाही. यामुळे ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याचा विषयही येत नाही.
त्याचबरोबर पक्ष आणि निवडणूक चिन्हाचाही प्रश्न येणार नाही, या विचारात शिंदे गट आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीला आता दोन वर्षेच राहिली आहेत. यामुळे अंधेरीत जो कुणी निवडून येईल त्याला जास्त काळही आमदार राहता येणार नाही. पुढच्या वेळीपर्यंत सारे चित्र स्पष्ट झालेले असेल. म्हणजेच एका बाणात शिंदे यांनी अनेक पक्षी मारण्याची सावध भूमिका घेतलेली आहे.
रमेश लटके कुटुंबीय कोणाच्या गटाचे... महत्वाचा प्रश्न हा की दिवंगत रमेश लटके यांचे कुटुंबीय कोणाच्या गटाच्या बाजुने आहेत, हा. तर शिंदे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लटके कुटुंबीय हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटाच्या बाजुने आहेत. यामुळे प्रघाताप्रमाणे शिंदे गट त्यांना घेऊन निवडणूक लढण्याचा विचारही करू शकत नाहीय. यामुळे नसत्या भानगडीत पडण्यापेक्षा चार हात लांब राहून छुपा पाठिंबा देण्यातच शिंदे गटाची भलाई असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात काही चमत्कार झाला, शिवसेना, धनुष्यबाण शिंदेंकडे आला तर त्यावेळची बात वेगळी असेल असेही या नेत्याचे म्हणणे आहे.