'वर्षा' सोडलं पण 'मातोश्री'वरुन लढली जाणार खरी लढाई, काय असेल उद्धव ठाकरेंचा 'प्लान-बी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:22 AM2022-06-23T11:22:18+5:302022-06-23T11:55:31+5:30

शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. पक्षाचे बहुतांश आमदार आज पक्षप्रमुखांचा आदेश झुगारुन बैठकीला उपस्थित न राहता एकेक करुन शिंदे गटात सामील होत आहेत. दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंच्या बाजूनं उभे असलेल्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशावेळी उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. पण शिवसेनेचे गटनेते आणि कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी जोरदार धक्का देत सुरुवातीला काही आमदारांसह बंडखोरी केली आणि सूरतला रवाना झाले. त्यानंतर शिंदे समर्थक आमदारांमध्ये गेल्या दोन दिवसांत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आता बोटावर मोजण्याइतके आमदार राहतात की काय असं चित्र निर्माण झालं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात आतापर्यंत तब्बल ४६ आमदार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे समर्थक आमदार सध्या गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना भावनिक साद घालत शिवसैनिकांना धीर देण्याचंही काम केलं. "तुम्हाली मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर तसं थेट समोर येऊन सांगा. मी आजच 'वर्षा' निवासस्थान सोडून मातोश्रीवर जात आहे. मला कोणत्याही पदाचा मोह नाही", असं म्हणत शिवसैनिकांच्या भावनेला हात घातला.

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणं बुधवारी रात्री वर्षा निवासस्थान सोडलं आणि ते मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत देखील केलं. 'वर्षा' निवासस्थान सोडून उद्धव ठाकरे बॅकफूटवर आले अशी चर्चा सुरू झाली. पण ही लढाई शिवसेना आणि ठाकरे कुटुंब अखेरपर्यंत लढेल असं संजय राऊत म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं असलं तरी राज्याच्या राजकारणचं केंद्र राहिलेल्या मातोश्रीचं महत्व त्यांना चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे मातोश्रीवर राहून पुढचे डावपेच आखणं अधिक अचूक ठरेल याची कल्पना कदाचित उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे 'मातोश्री'वरुनच शिवसैनिकांना साद घालत ते आपली पुढची वाटचाल सुरू ठेवण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत बंडाची ही काही पहिलीच वेळ नाही. पण आताचं बंड हे आजवरच्या इतिहासातील नक्कीच सर्वात मोठं बंड ठरलं आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे आपण प्रमुख आहोत त्याच पक्षाचे आमदार इतक्या मोठ्या प्रमाणात फुटणं याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारुन उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचं अस्त्र आजमावू शकतात. कारण याआधी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अशीच भूमिका घेतली होती.

छगन भुजबळ यांच्या बंडावेळी शिवसेनेतील वातावरण प्रचंड बिघडलं होतं. वातावरणाचा फायदा घेऊन असंतुष्ट आणि नाराज नेत्यांनी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली होती. यात माधव देशपांडे सर्वात आघाडीवर होते. शिवसेना स्थापनेपासूनचे ते नेते होते. अख्खी हयात आपण घराणेशाही विरोधात घालवली आणि याच शिवसेनेत आता घराणेशाही आणली जात आहे असा आरोप माधव देशपांडे यांनी केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे सक्रियपणे शिवसेनेत येऊ घातले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संतापाचा यानंतर स्फोट झाला होता. त्यांनी थेट राजीनाम्याचा धक्का दिला होता. 'सामना'च्या अग्रलेखात बाळासाहेब यांनी "शिवसेना ही आमची किंवा आमच्या कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही. निरोप घेताना मनास असंख्य यातना डसत असल्या, डोळे पाण्याने डबडबले जरी असले तरी आमच्या मनोदेवतेचा हाच कौल आहे. प्राप्त परिस्थितीत तो अपरिहार्य आहे", असं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच हेलावले होते. बाळासाहेबांच्या राजीनाम्याचं अस्त्र कामी आलं होतं आणि शिवसैनिकांनी 'मातोश्री'बाहेर भर पावसात प्रचंड गर्दी केली होती.

बाळासाहेबांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरुन बाजूला होत असल्याचं जाहीर करताच हजारो शिवसैनिक पेटून उठले होते. दुसऱ्या दिवशी सभेला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसैनिकांनी बाळासाहेबांना साकडं घातलं आणि त्यानंतर भावनांचा आदर करत बाळासाहेबांनी शिवसेनेचं प्रमुखपद स्वत:कडेच ठेवत असल्याची भूमिका घेतली. यामुळे झालं असं की एका फटक्यात पक्षांतर्गत विरोधक गार झाले होते.

बाळासाहेबांनी ज्यापद्धतीनं राजीनामा देण्याचं धाडस दाखवत शिवसैनिकांच्या भावनांना हात घातला होता. त्याच पद्धतीनं काल उद्धव ठाकरेंनीही काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद आणि पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचं बोलून दाखवलं. आता शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार शिंदे गटात सामील होत असल्यानं याची जबाबदारी स्वीकारुन उद्धव ठाकरे पक्षप्रमुखपद सोडण्याची तयारी दाखवू शकतात.

शिवसेनेचं पक्षप्रमुखपद ठाकरे कुटुंबाकडेच राहावं अशी एकंदर सामान्य शिवसैनिकांची भावना राहिली आहे. उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काल मुंबईत रसत्यावर शिवसैनिक देखील उतरले होते. त्यामुळे आमदार फुटले तरी सामान्य शिवसैनिक आपल्यासोबत आहेत याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे आणि हीच ताकद वापरुन उद्धव ठाकरे बंडखोरांना धोबीपछाड देण्यासाठीची तयारी सुरू करू शकतात.

'मातोश्री'वर परतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता राजकीय डावपेच आखणं आणखी सोपं झालं आहे. शासकीय पेचात आणि विचारधारेत न अडकता आता 'मातोश्री'च शिवसेनेचं केंद्र असल्याचं उद्धव ठाकरेंना दाखवून देता येईल. त्यामुळे येत्या काळात 'मातोश्री'वर बैठकांचं सत्र होताना पाहायला मिळू शकेल. तशी तयारी देखील उद्धव ठाकरेंनी सुरू केल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे.