Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:37 PM2023-02-18T13:37:00+5:302023-02-18T13:42:39+5:30

आता हा राजकीय बुद्धीबळाच्या सारीपाटावरचा स्मार्ट खासदार कोण, याचा शोध घेतला जात आहे. ही एकनाथ शिंदेंचीच खेळी असल्याचेही बोलले जात आहे.

गेले दोन दिवस ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सात जजच्या बेंचसमोर शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या याचिकांची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा शिंदे गटाला देऊन टाकला. या साऱ्यातून सावरण्याची तयारी ठाकरे गट करत असताना आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लाखो कागदपत्रे देण्यात आली होती. यामध्ये अगदी संपर्क प्रमुखापासून, शाखाप्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, खासदार, आमदार आदींची प्रतिज्ञापत्रे देखील होती. मात्र, यातील एका प्रतिज्ञापत्राने ठाकरे गटालाच सुरुंग लावला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शिवसेनेच्या दोन गटांत सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. एकीकडे आमदारांचा मोठा गट असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस असे सरळसरळ दोन बाजुंचे राजकारण सुरु झाले आहे.

असे असताना शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले होते. त्यानंतर कीर्तीकर देखील शिंदे गटात गेले होते. परंतू ठाकरे गटात राहिलेला एक खासदार असा होता, जो होता ठाकरे गटात पण शिंदे गटाला सारी रसद पुरवित होता. आता हा १४ वा खासदार कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

या खासदाराने ठाकरे गटात राहुन निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र मात्र शिंदे गटाचे दिले आहे, असे सुत्रांनी सांगितले आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खासदार दोन्ही दगडांवर पाय ठेवून होता असेही बोलले जात आहे.

आता हा राजकीय बुद्धीबळाच्या सारीपाटावरचा स्मार्ट खासदार कोण, याचा शोध घेतला जात आहे. ही एकनाथ शिंदेंचीच खेळी असल्याचेही बोलले जात आहे.

ठाकरे गटात काय काय चाललेय याची माहिती मिळविण्यासाठी या खास खासदाराला शिंदेंनी ठाकरेंच्या गोटात ठेवले असेल असे बोलले जात आहे. दुसरीकडे असे असेल तर आमदारांमध्येही कोणीतरी शिंदेंनी मागे ठेवला असेल, असेही बोलले जात आहे.