विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:12 PM 2022-08-18T18:12:17+5:30 2022-08-18T18:15:58+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्यासोबत विधानसभेचे ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा हाती घेतला. त्यानंतर शिवसेनेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे २ दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विधिमंडळाचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यात विधान परिषदेत पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आला.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केली आहे. परिषदेत राज्यातील प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांसंदर्भातील त्रुटीबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेनेचे अनिल परब आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही खडाजंगीत उतरले.
पूर्वीच्या शासनाने घेतलेले निर्णय त्याची पडताळणी करून त्यातून योग्य निर्णय घेतले आहेत. शिक्षकांच्या वेतनाबाबत मंगळवारी बैठक घेतली जाईल. सरकार सकारात्मक निर्णय घेत असेल सर्वांनी सहकार्य केले पाहिजे असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं. त्यावर अनिल परब यांनी शिक्षणमंत्री अभ्यासू आहेत. त्यांनी अभ्यास केलाय म्हटलंय. ज्यावेळी मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खाते होते त्यांची सही झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सही झाली त्यानंतर त्यावर बोलण्याची गरज नव्हती असं प्रत्युत्तर दिले.
अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर विधान परिषदेत गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १ मंत्री दादागिरीची भाषा करत असेल तर त्यांना आम्हालाही उत्तर देता येते असं म्हटलं.
दानवे म्हणाले की, जेव्हा संबंधित सभागृहाचे मंत्री चर्चेत उत्तर देत आहेत. तेव्हा दुसऱ्या खात्याचे मंत्री चर्चेत मध्ये मध्ये बोलून दादागिरीची भाषा करत होते. त्या मंत्र्यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीने दादागिरी करू लागलेत. त्या खात्याचे मंत्री उत्तर देतायेत असं सांगितले. तेव्हा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शब्दाला शब्द वाढवू नये. प्रत्येकाने आपापल्या जागी बसावं. प्रश्नोत्तराचा तास व्यवस्थित सुरू द्यावा असं पाटील यांनी सारवासारव केली.
त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, विरोधी पक्षनेते दानवेंनी मंत्री गुलाबराव पाटील खाली बसून विधानं करतायेत असा आरोप केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हात वर करून बोलण्याची संधी मागतायेत. त्यांना काय बोलायचं बोला. त्यावेळी गुलाबराव पाटील बोलतात की, शिक्षण मंत्री एका प्रश्नावर उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते म्हणतात एक मंत्री दादागिरी करत होते. अहो माझच्या कॅबिनेटमध्ये मी स्वत: मंत्री होतो. ४ महिने एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब वेतन देऊ शकले नाहीत असा आरोप केला.
त्यावर निलम गोऱ्हे यांनी "गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?", असं उपसभापतींनी सुनावलं. यावर गुलाबराव पाटील यांनी "मी मंत्री आहे", असं म्हटलं. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि "मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा", असं सुनावलं.
सभागृहात गोंधळ उडाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत बसण्याची विनंती केली. तरीही सभागृहात सत्ताधारी-विरोधक समोरासमोर आले होते. त्यात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रश्न राखून ठेवला आणि सभागृहाचं कामकाज पुढे चालवण्याची सूचना केली. मात्र मंत्री दीपक केसरकर यांनी माझ्याकडे समर्थक उत्तर आहे. सभागृहात गोंधळ झाल्यानं मी बैठक घेऊ असं सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे प्रश्न राखून ठेवला ही नोंद सभागृहाने घेऊ नये.