Eknath Shinde: शिवसेनेत बंडखोरी का केली?; शिवसैनिकांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:33 PM2022-06-22T14:33:06+5:302022-06-22T14:36:16+5:30

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यसभेत आणि विधान परिषदेत संख्याबळ नसताना भाजपाचे उमेदवार विजयी झाले. यामागे महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी दिसून आली.

विधान परिषदेच्या निकालानंतर अचानक एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथे पोहचले. त्यानंतर हे आमदार नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले. शिंदे यांनी भाजपासोबत सरकार बनवावं असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला.

मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरी का केली? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात कायम आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे.

या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले, ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेचे ४६ आमदार एकत्र आहोत. शिवसेना पक्षाची विचारधारा हिंदुत्वाची आहे. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. धर्मवीर आनंद दिघेंच्या सानिध्यात काम करणारे आम्ही आहोत. त्यामुळे हिंदुत्वाची विचारधारा आम्ही पुढे नेतोय.

महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील हा विचार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. ४६ आमदारांनी जो निर्णय घेतला आहे. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे हिंदुत्व, जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आम्ही भूमिका घेतली.

तसेच मिलिंद नार्वेकर यांना चर्चेला पाठवलं. तेव्हा उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोललो. मी म्हटलं, चर्चा करायला नार्वेकरांना पाठवलं, त्याचवेळी गटनेतेपदावरून काढलं. माझे पुतळे जाळले, मला बदनाम करण्याचं काम केले. एकाचवेळी चर्चा आणि दुसरीकडे आंदोलन, बदनामी असं होत नाही.

वेळोवेळी आमदारांच्या मनातील खदखद उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली होती. आपण विचार करून निर्णय घेऊ असं ते बोलत होते. शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याची मानसिकता नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले.

४६ पेक्षा जास्त आमदार आम्ही एकत्र आहोत. संध्याकाळी बैठक झाल्यावर त्यात आमदारांची मते जाणून घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं शिंदेंनी सांगितले. त्याचसोबत नितीन देशमुख यांना स्वत: भेटायला गेलो होतो. आज त्यांना आमचे कार्यकर्ते सोडायला गेले होते असं सांगत अपहरणाचा आरोप फेटाळला.

दरम्यान, आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन पुढे चाललोय. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते होते. त्यांचं काम आम्ही पुढे घेऊन जातोय. विधानसभा बरखास्त करायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

त्यातच आता शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजता ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात येणार आहे.

या बैठकीस लिखित स्वरुपात वैध, पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही. या बैठकीस उपस्थित न राहिल्यास स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल अशा बंडखोर आमदारांवर कारवाई होईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.