Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:43 PM2024-11-05T16:43:24+5:302024-11-05T16:51:57+5:30

Uddhav Thackeray MVA News: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे प्रचार सभा झाली.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत ठाकरेंनी मविआचं सरकार आल्यास काय करणार, याबद्दल भाष्य केलं.

ठाकरे म्हणाले, राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. पण, मुलांना नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर मुलींप्रमाणेच मुलांनाही उच्च शिक्षण मोफत दिले जाईल.

पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना तक्रार करण्याबद्दल कळत नाही. त्यामुळे सरकार आल्यावर तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात पोलीस ते वरिष्ठ पदांपर्यंत महिला अधिकारी असणारे विशेष पोलीस ठाणे सुरू केले जाईल.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अदाणींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे दिले जातील, अशी घोषणा ठाकरेंनी केली. धारावी, मुंबईत भूमिपुत्रांना माफक दरात घरे उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल, असे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.

मविआचे सरकार आल्यानंतर पाच वर्षाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. दरात कोणताही बदल केला जाणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तुंचे भाव स्थिर ठेवू, असेही ठाकरे म्हणाले.