Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:02 PM2024-12-04T13:02:41+5:302024-12-04T13:26:31+5:30

मुंबईतील आझाद मैदानावर उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील, हे निश्चित मानलं जात आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसत आहे.

२०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत आपली खुर्ची सोडावी लागली होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांना पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास अचंबित करणारा राहिला आहे. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.

फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी.एस.ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्यांच्या वडिलांची आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला.

महापौर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना, जनसंघाचे सदस्य असताना, सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. फडणवीस यांनी नंतर इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला. त्यांना पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते, कारण त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले होते. त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या सरस्वती विद्यालय शाळेत करण्यात आली, जिथे त्यांनी त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण घेतले. फडणवीस यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतरही त्यांनी अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रि‍पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली होती. मात्र ते सरकार अवघ्या काही तासांत कोसळलं. आता उद्या मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील, हे निश्चित मानलं जात आहे.