सरपंच ते राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद; राम शिंदेंचा 'असा' आहे राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:38 IST2024-12-19T12:33:56+5:302024-12-19T12:38:18+5:30

विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपा आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या अडीच वर्षापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर आज राम शिंदे हे सभापती पदाच्या खुर्चीत बसले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्वांनी राम शिंदे यांचे अभिनंदन केले.

राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी अहिल्यानगरच्या चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे शेतमजूर होते. दुसऱ्याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच त्यांचे अर्धे आयुष्य गेले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राम शिंदे यांची जडणघडण झाली.

गरिबीच्या परिस्थितीवर मात करत राम शिंदे यांनी एम. एस्सी. बीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि. बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली. सन १९९५ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली.

१९९७ मध्ये भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून शिंदे यांनी निवडणूक लढवली परंतु अवघ्या २०० मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २००० मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून सलग पाच वर्षे सरपंचपद मिळवले.

२००२ जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून राम शिंदे यांना उमेदवारी डावलण्यात आली तेव्हा शिंदे यांनी माघार न घेता दुर्बल घटकातून अपक्ष निवडणूक लढवली मात्र अवघ्या एका मताने राम शिंदेंना पराभव सहन करावा लागला

२००६ मध्ये भाजपाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी राम शिंदेंची निवड झाली. २००७ मध्ये पत्नी आशा शिंदे या भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून विजयी झाल्या. २००९च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून ते दहा हजार मतांनी विजयी झाले. तेव्हाच्या अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेश सरचिटणीस अशी जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे ४५ हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी भाजपाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे काम शिंदेंनी सांभाळले. त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. ते नगर जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री राहिले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. २०२४ च्या विधानसभेत शिंदे पुन्हा एकदा महायुतीकडून कर्जत जामखेड मतदारसंघात उभे होते. परंतु अवघ्या १२०० मतांनी त्यांचा पराभव झाला.

अनेकदा पक्षात असेही प्रसंग आले जेव्हा त्यांना उमेदवारीवरून डावलले गेले परंतु राम शिंदेंनी पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान कमी केले नाही. त्यामुळे भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली. शांत, संयमी नेतृत्व म्हणून राम शिंदे यांची ओळख असली तरी जनतेच्या प्रश्रासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत.

राम शिंदे यांची सभापती निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक करताना म्हटलं की, २०२४ च्या निवडणुकीत राम शिंदे यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र विधान परिषदेचं सभापती पदी शिंदेंनी राहावं हे कदाचित नियतीनं ठरवलं असेल असं आपण त्याकडे पाहिले पाहिजे.