खुशखबर! राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात, अकरा जिल्हे कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 02:46 PM2022-05-09T14:46:32+5:302022-05-09T14:55:25+5:30

पण, धोका टळलेला नाही; काही जिल्ह्यांत रुग्णवाढ

प्रवीण खेते। अकोला: सद्यस्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात असून, राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये कोविडचा एकही सक्रिय रुग्ण नाही. यातील सहा जिल्हे हे विदर्भातील आहेत. उर्वरित जिल्ह्यापैकी पाच जिल्हे कोविडमुक्तीच्या मार्गावर आहेत.

तब्बल दोन वर्षांनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळत असला तरी काही जिल्ह्यामध्ये अजूनही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. कोविडचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे आवश्यक खबरदारी चाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, राज्यात ११०९ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत आहेत. तर १० पेक्षा कमी रुग्ण उर्वरित आणि ११ जिल्ह्यांत एकही सक्रिय रुग्ण नाही. जळगाव, नंदूरबार, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया हे शून्य रुग्ण असलेले जिल्हे आहेत.

आरोग्य विभागाने जुलै, ऑगस्टदरम्यान कोविडच्या संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचंही सांगण्यात येतंय. शून्य रुग्ण असलेले जिल्ह्यांमध्ये जळगाव, नंदुरबार, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोदिया यांचा समावेश आहे.

तर ११ जिल्हे कोविडमुक्तीच्या मार्गावर आहेत. कोविडमुक्तीच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे.

वाशिम, बुलडाण्याने देखील चिंता वाढवली आहे. वाशिम जिल्ह्यात चार, तर बुलडाणा जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले आहेत. कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने विभागातील नागरिकाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.