विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:05 IST2025-02-06T14:48:04+5:302025-02-06T15:05:18+5:30

मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.

पंढरपुरात माघ एकादशी यात्रेला दरवर्षी सुमारे ४ ते ५ लाख भाविक येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी पुजांची संख्या कमी करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.

श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २ व रात्री ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू आहे.

मंदिर समितीचे संकेतस्थळ, मोबाईल अॅप वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध आहे. देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाइन देणगीसाठी क्यूआर कोड, आरटीजीएस, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदीलाडू प्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती केल्याची माहिती मनोज श्रोत्री यांनी दिली.

चक्रीभजनाची परंपरा, पहाटे नित्यपुजा होणार- यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीची नवमीला श्री विठ्ठल सभामंडप येथे आरती व अभंग, ह.भ.प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह.भ.प. औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्रींची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.

पददर्शन रांग पत्राशेडपर्यंत- देवाचे दर्शन घेणे अधिक कठीण होते, अगोदरच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेडपर्यंत पोहोचली होती. यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी उशीर लागत होता. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पसंती देत आहेत. यामुळे शहरातील पार्किंगच्या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांचे गर्दी झाली होती. त्याचबरोबर मंदिर परिसर देखील भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलेला दिसून आला.

भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकू बुक्का, तुळशीच्या माळा, फुलविक्रेते, वेगवेगळ्या धातूच्या मूर्ती, फोटो फ्रेम आदी दुकाने लागली आहेत.

रांगेत लाईव्ह दर्शन.. चहा, खिचडीचीही सोय- माधी एकादशी सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी बुधवारी गर्दी केली आहे. यामुळे गोपाळपूर रोडलगत असणाऱ्या पत्राशेडपैकी पाच पत्राशेडपर्यंत भाविकांची दर्शन रांग पोहचली होती.

मंदिर समितीकडून माघी यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा-खिचडी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता आऊटसोर्सिंग पद्धतीने करण्यात येत आहेत.

१०० सीसीटीव्ही कॅमेरे- रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टैंड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशीन, अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था केल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.