ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 20 - 'अस्तित्व तिच्या नजरेतून' ही संकल्पना घेऊन लोकमत माध्यम समूहाच्या पुढाकाराने एनईसीसी, युनिसेफ आणि युएन वूमेन यांच्या सहयोगाने 'लोकमत वुमेन समिट'चे सहावे पर्व सोमवारी रंगले. यावेळी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा, राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या अॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, कुस्तीपटू गीता फोगट, व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, हिता अजमेरा, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, विजय बाविस्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अलेक्झांड्रा वेस्टरबिक म्हणाल्या की, 'समाजमनाला आणि विचारांना मूर्त रुप देण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रश्न समोर आणण्याची भूमिका माध्यमे पार पाडतात. सध्या सुमारे 15 अब्ज बालके कुपोषणाने पीडित आहेत. कुपोषणामुळे होणाऱ्या बालकमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. बालकांचे अनारोग्य, सकस आहाराचा अभाव, शिक्षणाचा अभाव हे प्रश्न युनिसेफने हिरीरीने मांडले आहेत. भारत सरकारच्या सहयोगाने येथेही आरोग्य, आहार, शिक्षण याबाबत काम केले जाते. कुपोषणाची समस्या हद्दपार केल्याशिवाय भारताचा सर्वांगीण विकास होणार नाही. मुलांचे योग्य पोषण झाल्यास कुटुंबे आणि समाजही सुदृढ होतो. त्यासाठी तळागाळात जाऊन जनजागृती होणे महत्वाचे आहे. बालकांच्या पोषणावर करण्यात येणारा खर्च ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. बालविवाहाला आळा, कुमारवयातील गर्भधारणा, प्रत्येक बालकाला सकस आहार आणि पोषणमूल्ये मिळणे ही सध्याची महत्वाची उद्दिष्ट्ये असायला हवीत'.(लोकमत वुमेन समिटमध्ये आज उलगडणार ‘अस्तित्व ‘ती’च्या नजरेतून)दरम्यान, महिला चळवळीकडे महिलांच्या नजरेतून पाहत पुढील मार्गाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचली आहे. या चळवळीचेच राष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या लोकमत वुमेन समिटशी आता महिलांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनिसेफ आणि यूएन वुमेन (संयुक्त राष्ट्रसंघाची महिला शाखा) या संस्थाही जोडल्या गेल्या आहेत. लोकमत सखी मंचने आतापर्यंत महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर मूलगामी काम केले आहे.