भेंडवड घटमांडणीची क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 23:19 IST2018-04-19T23:19:01+5:302018-04-19T23:19:01+5:30

शेतक-यांची उत्सुकता वाढविणारी सुप्रसिध्द भेंडवळ घटमांडणी आणि या मांडणीचे भाकीत १९ एप्रिल पहाटे सुर्योदयासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. त्यानुसार राजा कायम राहणार असून यावर्षी पाऊस चांगला येणार असल्याचे सांगत पिक परिस्थिती उत्तम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदी वातावरण होते.
राजाची गादी आणि राजा म्हणजे विड्याचे पान व त्यावरील सुपारी हे कायम होती. त्यामुळे देशाच्या राजाला कुठलाही धोका नाही राजा कायम राहील. परंतु पानावर थोड्याप्रमाणात माती असल्यामुळे अंतर्गत संकटाचा सामना राजाला करावा लागेल. पर्यायाने राजाचा ताण वाढेल.
घटातील घागरीवर असलेली पुरी यावेळी कायम होती त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या स्वरूपाची आपत्ती येणार नाही. पाऊस भरपूर असल्याने तसेच अवकाळी पावसाचे वाढते प्रमाण यामुळे जलाशयात भरपूर पाणी राहील.
यावर्षी गुराढोरांना चारा पाण्याची टंचाई भासणार नाही घागरीवरील सांडोळी कुरडी कायम असल्याने भरपूर चारा मिळेल व पाण्याचीही टंचाई भासणार नाही यामुळे पशुपालकांची चिंता मिटेल.
घटामध्ये संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक असलेली कुरडी मोघम असल्याने देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम असेल संरक्षण खाते जागृत राहीत. शत्रु घुसखोरी करणार नाही परकीय आक्रमणाची भिती राहणार नाही कारण यावेळी शत्रुचे प्रतीक असलेले मसुर हे धान्य मोघम आढळून आले.
पाऊस चांगला होवून पिके चांगली येतील त्यामुळे देशाची तिजोरी भरलेली राहील. देशाला पैशाची चिंता भासणार नाही परंतु शेतीमालाच्या भावात कुठलीही तेजी येणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडेल, असे भाकीत भेंडवळ घटमांडणीतून करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षापेक्षा यावर्षी पाऊस चांगला राहील. पिकेही चांगली येतील मोठी नैसर्गिक आपत्ती नाही तसेच चारापाण्याची टंचाई राहणार नाही एकंदर यंदाचे भाकीत शेतक-यांसाठी समाधानकारक असल्याचे सारंगधर महाराज वाघ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.