"सामना कार्यालयात ‘फ्रंट मॅन’कडून संजय राऊतांना पैसे घेताना मी पाहिलंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:57 AM2022-09-21T09:57:06+5:302022-09-21T10:00:36+5:30

पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे. १ ऑगस्टला संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२१ मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावा केला.

संजय राऊतांनी बेहिशेबी रोकड वापरून पत्नी आणि कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावे जमीन खरेदी केल्या. कुठल्याही गॅरंटीशिवाय राऊतांनी नातेवाईकांकडून कर्जाच्या नावाखाली पैसे घेतले. आई, भाऊ, चुलत भाऊ आणि अन्य लोकांकडून संजय राऊतांनी कर्ज घेतलेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचं स्त्रोत नाही.

प्रविण राऊतांच्या २ कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना पैसे दिले होते असा दावा ईडीच्या तपासात या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. स्वप्ना पाटकर म्हणाल्या की, अलिबाग येथे खरेदी केलेल्या जमिनीवर संजय राऊतांना रिसोर्ट बांधायचं होतं. परंतु त्याठिकाणी असलेल्या सीआरझेड निकषांमुळे ही योजना फिस्कटली.

२००८ ते २०१४ या काळात मी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात स्तंभलेखिका होती. राऊतांना इंग्रजीत लेख लिहण्यात मदत करत होती. राज्यसभेच्या कामातही मी त्यांना मदत केली. या काळात या प्रकरणातील आरोपी प्रविण राऊत यांच्या २ कर्मचाऱ्यांना सामना कार्यालयात आलेले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं आहे असं त्यांनी सांगितले.

ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रविण राऊत हा संजय राऊतांसाठी ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करत होता. पत्रा चाळ प्रकल्पाबाबत साक्षीदाराने ईडीला सांगितले की, २००८-०९ दरम्यान परिसरातील रहिवाशांनी चाळीच्या पुनर्विकासासाठी स्थानिक नेत्यांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता.

विविध बैठकांनंतर संजय राऊत, प्रविण राऊतांना एचडीआयएलचे राकेश वाधवान यांच्यासोबत योजना पूर्ण करण्यास सांगितली. प्रविण राऊत हे संजय राऊतांच्या वतीने काम करत होते. ते एचडीआयएलकडून मिळणाऱ्या पैशातून महिन्याला २ लाख रुपये संजय राऊतांना द्यायचे असं साक्षीदारानं सांगितले.

संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून 'ठाकरे' सिनेमा काढला होता. राऊतांनी या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरले. मराठी सिनेमाच्या माध्यमातून नफा दाखवत राऊतांनी ५० लाख रुपये घेतले.

जानेवारी २०१५ मध्ये मराठी सिनेमा बाळकडू रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा कुठल्याही लाभाशिवाय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आला. मात्र या सिनेमानं ६० लाख रुपये निव्वळ नफा कमवला. त्यापैकी राऊतांनी ५० लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले. त्यांच्या नावाने धनादेश काढला. या सिनेमासाठी संजय राऊतांचं कुठलेही योगदान नव्हतं. त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून ५० लाख रुपये घेतले असं स्वप्ना पाटकर यांनी ईडीला सांगितले.

तर ईडीनं या सर्व जमिनीच्या व्यवहारात रोख रक्कम असल्याचे तुम्हाला कसं समजलं, असे विचारले असता, साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी सांगितले की, माझे पती सुजित पाटकर हे राऊतच्या वतीने रोख रकमेसाठी सर्व जमीनमालकांशी समन्वय साधत होते आणि यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पाटकर आणि जमीनदार साक्षीदार होते.