मातोश्रीहून मिलिंद नार्वेकरांचा फोन आला, अन्...; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 09:00 PM 2023-02-05T21:00:05+5:30 2023-02-05T21:03:51+5:30
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे एकनिष्ठ आणि विश्वासू मानले जातात. जितेंद्र आव्हाड यांचं शरद पवारांसोबत भावनिक नाते आहे. मात्र राजकीय जीवनात आलेल्या चढ उताराबाबत आव्हाडांनी भाष्य केले आहे.
अनेक संधी आपल्याला मिळत असतात. नेमकी संधी कशी आहे आणि ती आपल्या चारित्र्याला किती मारक आहे हे माणसाने विचार केला पाहिजे. कारण जेव्हा आपण घडत असतो तेव्हा कुणीतरी आपल्याला घडवत असते असं आव्हाड यांनी सांगितले.
घडवणाऱ्याचा विसर पडणे हे माझ्यादृष्टीने किळसवाणं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदार करतो असं म्हटलं. मी त्यांना अत्यंत आदरपूर्वक नाही म्हटलं. मला मातोश्रीहून मिलिंद नार्वेकरांचाही फोन आला होता असा गौप्यस्फोट आव्हाडांनी केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मातोश्रीहून मिलिंद नार्वेकरांचा फोन आला होता. तुला शिवसेनेचं महत्त्वाचं पद देऊ. अत्यंत आदाराने मी त्यालाही नाही म्हटलं. काही मिळतंय या विचाराने कुठेही धावत जाणे हे आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यासारखे आहे असं त्यांनी सांगितले.
संधी अनेक येतात. पण ज्याने आपल्याला उचलून वर आणले त्याच्याशी प्रतारणा करू नये असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचसोबत माझ्या मागे कुठलाही ससेमिरा नाही. काय कुणाला करायचं असेल तर करू द्या असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मला मागच्या ३ वर्षात कुठलीही आमिषे मिळाली नाहीत. मी खोटी नावे घेणार नाही. मी एकंदर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाबद्दल बोलतोय. माझ्याबद्दल बोलतोय. मी फक्त २ उदाहरणे दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदार करतो म्हटलं हे आमिष नव्हते तर त्यांचे माझ्यावर प्रचंड प्रेम होते असं आव्हाडांनी म्हटलं.
त्याचसोबत मातोश्रीवरून कॉल आला ते आमिष नव्हते तर त्यांना एक हक्काचा माणूस हवा होता आणि त्यांना तो जितेंद्रमध्ये दिसत होता आणि हे सगळं शरद पवारांची कृपा आहे त्यांच्यामुळे जितेंद्रला वलय आले. मी मरेपर्यंत हे विसरू शकत नाही अशी ग्वाही जितेंद्र आव्हाडांनी दिली.
ज्यांना जायचं तो जाऊ शकतो. जाणारा माणूस केवळ कारण शोधत असतो. जितेंद्र आव्हाडांनी मला पोलीस स्टेशनला मदत केली नाही. जितेंद्र आव्हाडांनी अमुक केलं नाही तमुक केले नाही. जे केले त्याचा पाढा वाचा. तो वाचायचा नाही केवळ दिशाभूल करायची असते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.