जय भवानी...जय शिवाजी! फडणवीसांच्या हस्ते जळगावात छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:00 PM 2021-12-29T20:00:53+5:30 2021-12-29T20:14:36+5:30
जळगावत जिल्ह्यातील चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या दिमाखात अनावरण. पाहा Photos... जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचं भाग्य लाभलं याबाबत फडणवीसांनी आभार व्यक्त केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
युगपुरुष म्हणजे, जे सामान्यांना जागृत करून त्यांच्याकडून असामान्य काम करवून घेतात. म्हणूनच अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी रयतेचे राज्य प्रस्थापित केले, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांसोबतच या कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे छत्रपती, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, मंगेश चव्हाण देखील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणासाठी मोठ्या दिमाखात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
अनावरण कार्यक्रमात फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित देखील केलं. "राजकारभाराचा मोठा आदर्श छत्रपतींनी निर्माण केला. जलसंवर्धन, वनसंवर्धन, गरीब कल्याण, अत्याचारविरहित राजवट, सागरी सुरक्षा अशा कितीतरी बाबी त्यांनी शिकविल्या. आजही कुठली समस्या आली, तर त्याचे उत्तर शिवचरित्रातून मिळते. आमच्या या महान राजाला कोटी कोटी दंडवत !", असं फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं.