कैलास गोरंट्यालनी विधानसभेत क्रूर बटण गोळीचा उल्लेख केला; ते नेमके काय? सावध व्हा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:07 PM 2023-07-18T20:07:15+5:30 2023-07-18T20:14:26+5:30
कैलास गोरंट्याल यांनी बटण ड्रग्ज गोळीचा उल्लेख सभागृहात केला. आणि पुन्हा त्या गोळीची राज्यभरात चर्चा सुरु झाली... आता तिचे नाव बदलतेय.. पण तिचा परिणाम खूप भयानक, क्रूर आहे. कैलास गोरंट्याल यांनी बटण ड्रग्ज गोळीचा उल्लेख सभागृहात केला. या गोळीचा नशेसाठी वापर करून क्रुरता केली जाते, याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आज गोरंट्याल यांनी केली आहे. आता ही बटण गोळी म्हणजे नेमके काय?
बटण गोळी ही १० रुपयांत सर्वत्र सर्रास उपलब्ध आहे, असा आरोप केला जातो. गेल्या वर्षी या बटण गोळीच्या सहज उपलब्धतेवर लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून बटण, ऑरेंज, कीटकॅट नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ देण्याचा उद्योग सुरू असल्याचे यातून समोर आले होते.
या गोळ्या खाल्ल्यानंतर इतर व्यसन केल्यानंतर येतो तसा कोणताही वास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांतील मुलांबरोबर उच्च स्तरातील मुलेही गोळ्यांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. काहीजण चौपट पैसे घेऊन गोळ्यांची विक्री करीत असतात.
बटण हे नाव सर्वांना माहिती झाले, त्यामुळे आता ऑरेंज, कीटकॅटच्या नावाने या गोळ्या विकल्या जातात. आणखी काही दिवसांनी यांचीही नावे बदलतील परंतू, त्यांचा उद्देश सारखाच म्हणजेच नशेसाठी असेल.
मुख्यत: या गोळ्या मनोरुग्णांसाठी वापरल्या जातात. एक, दोन किंवा तीन अशा प्रमाणात त्या मनोरुग्णांना झोप यावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने दिल्या जातात. या कारणासाठी या गोळ्या उपलब्ध असल्या तरी नशेडी लोक कमी पैशांत नशा करण्यासाठी या गोळ्यांचा गैरवापर करतात.
व्यसन वाढल्यानंतर गोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती व्यक्तीत तयार होते. शिवाय माानसिक आजारांबरोबर शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते. काही वर्षांत नशेच्या गोळ्यांमुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.
गोळीतील रासायनिक घटकांमळे झोप येते. अनेक आजारांत ते महत्त्वाचे ठरते; परंतु व्यसनापोटी अनेक गोळ्या घेतल्या जातात. त्यातून हळूहळू गोळ्यांची संख्या वाढते. शेवटी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. त्यातून त्याचे व्यसनात रूपांतर होते.
गोळ्या खरेदीसाठी पैसे मिळविण्यासाठी नशेखोर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांकडे याचना करतात. पैसे मिळाले नाहीत, तर भांडण, प्रसंगी मारामारी करतात. अनोळखी व्यक्तींना धमकावून, मारहाण करून पैसे लुटण्यास ते घाबरत नाहीत. त्यातून अनेक गैरकृत्ये त्यांच्या हातून घडतात.
व्यसनाचे प्रमाण व्यक्तीमध्ये वाढल्यानंतर एकाच वेळी १० ते ५० गोळ्या खाण्याचे प्रकार होतात. असे अनेक रुग्ण यापूर्वी समोर आलेले आहेत. गोळ्यांसोबत किमान दोन ते तीन अमली पदार्थ एकत्र करून सेवन करण्याचा प्रकारही होतो.