Kas Pathar Latest Update: कास पठार फुलले, तरुण-तरुणी भुलले! डोळे तृप्त करणारे अफलातून Photo's... By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:17 PM 2022-09-26T16:17:15+5:30 2022-09-26T16:32:14+5:30
Kas Pathar Photo's : विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून. राजमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी कासच्या फुलोत्सवाचा आनंद लुटला.
विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान कास- महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसत आहेत.
पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.
कुमुदिनी तलाव हाऊसफुल्ल कास पठारावर परदेशी पाहुणे देखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. परदेशी पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत देश-विदेशातील बहुसंख्य पर्यटकांची पावले राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.
कास पुष्प पठारावर साधारण ३७५ फुलांच्या प्रजाती असून, सध्या ४० ते ५० प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. नवरात्रोत्सवात आणखी प्रजातींच्या फुलांचे फ्लॉवरिंग होण्याची शक्यता आहे.
कास पुष्प पठारावरील साडेतीनशेच्या आसपास दुर्मीळ प्रजाती वर्षभर येतात. चाळीस ते पन्नास प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगले फ्लॉवरिंग आहे. फ्लॉवरिंगसाठी वातावरणपोषक आहे. यापेक्षा पुढील वर्षी अधिक चांगल्या प्रकारची फुले पाहावयास मिळतील.
९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था... ९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. https://www.kas.ind.in/booking.php या वेबसाईटवर बुकिंग करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी १०० रुपये तिकीट आहे. ५ वर्षांखालील मुलांना मोफत आहे. तसेच पीएमपीएमएलची बससेवा देखील आहे. - सर्व छाया: सागर चव्हाण