Sanjay Raut Vs BJP: संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 08:52 AM2022-08-02T08:52:22+5:302022-08-02T08:55:39+5:30

Sanjay Raut Vs BJP: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारची ढाल असलेले संजय राऊत भाजपच्या निशाण्यावर नेमके कधीपासून आले? जाणून घ्या...

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून ते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देईपर्यंत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) एकटेच भाजपला जोरदार भिडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने सातत्याने त्यांना लक्ष्य केले. सत्ता संघर्षाच्या काळात राऊतांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. दररोज सकाळी ते माध्यमांशी संवाद साधायचे. भाजपवर घणाघाती टीका करायचे. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतरही राऊत यांचा धडाका सुरूच होता.

सन २०१९ च्या अखेरपासून याची सुरुवात झाली. विधानसभेची निवडणूक झाली. निकाल लागला. भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असल्याने शिवसेना-भाजप युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातले संबंध टोकाला गेले आणि शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मदतीनं राऊत जबरदस्त राजकीय चाल खेळले. राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. कोरोना काळात होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, एनसीबीचे छापे, ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया यांसह अनेक बाबींवर राऊत भाष्य करायचे. भाजप नेत्यांकडून होत असलेले शाब्दिक हल्ले परतवून लावण्याचे काम त्यांनी केले.

मविआ सरकारसाठी ढाल बनून काम केले. ठाकरे सरकारवर होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचं काम राऊतांनी केले. पक्षात त्यांचे महत्त्व वाढत गेले. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यात राऊतांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच राऊत भाजपच्या रडारवर आले. त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवरही ईडीची कारवाई सुरू झाली.

अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही संजय राऊत यांचा निसटता विजय झाला. अगदी काठावर संजय राऊत पास झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांत एकनाथ शिंदेंनी बंड केले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई वेग धरणार असे म्हटले जात होते. शिंदे सरकारला महिना पूर्ण होताच ईडीने राऊतांना अटक केली. मात्र राऊत यांचा झुकेगा नहीं पवित्रा कायम आहे.

दरम्यान, मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. यानंतर ईडीने संजय राऊतांना न्यायालयासमोर हजर केले. तेथे दोन्ही बाजूने झालेल्या जोरदार युक्तिवादानंतर संजय राऊत यांना ०४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.