'अशी' आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांची कारकीर्द By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:08 PM 2021-03-17T18:08:49+5:30 2021-03-17T18:17:55+5:30
परमबीर सिंग यांच्या जागी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले हेमंत नगराळे कोण आहेत? त्यांची यापूर्वीची कारकीर्द कशी होती? त्यांना कोणकोणते मानसन्मान मिळाले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर... (know everything about hemant nagrale) उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरु होत्या. अखेर परमबीर सिंग यांच्याजागी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात फेरबदलाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर नगराळे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. नगराळे सध्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आहेत. महासंचालक पदावरून त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे हेमंत नगराळे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेमंत नगराळे मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे याच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते.
हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, तेव्हा वाशी परिसरातील बँक ऑफ बडोदा येथे झालेल्या दरोड्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. या प्रकरणात हेमंत नगराळे यांच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात या गुन्हाच तपास केला होता. पॉप गायक जस्टिन बीबर यांच्या कार्यक्रमादरम्यान चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल सरकारने त्यांचे कौतुक केले.
हेमंत नगराळे कर्तव्यावर दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठीही ते प्रसिद्ध आहे. नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.
हेमंत नगराळे १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. १९९२ च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना हेमंत नगराळे यांनी १९९४ ते १९९६ या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचे प्रकरण त्यांनी हाताळले होते. १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.
हेमंत नगराळे १९९८ ते २००२ या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीतही सेवा बजावली. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली.
लहान मुलांचे अपहरण व हत्या करणाऱ्या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही हेमंत नगराळे यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गावित हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीच्या प्रकरणात हेमंत नगराळे यांनी बँकेचे अध्यक्ष व ऑपरेटरविरूद्ध FIR दाखल करण्याचे आदेश दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदारांवर FIR दाखल करता येत नाही. यामुळे तत्कालीन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यासह नगराळे यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.
नगराळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या व्हीआरसीई (आताची व्हीएनआयटी) मधून बीई (मेकॅनिकल) मधून ग्रॅज्युएट झाले.
पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल हेमंत नगराळे यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकाने गौरवण्यात आले आहे.
परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तर परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.