स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:57 PM 2024-11-27T12:57:17+5:30 2024-11-27T13:07:02+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही मुख्यमंत्रिपदावरील दावा सहजासहजी सोडायला तयार नाही आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा कधी सुटेल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. एकीकडे तब्ब्ल १३२ जागा जिंकल्याने आता महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री असावा, अशी भूमिका भाजपाचे कार्यकर्ते, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी आपलं वजन भाजपाच्या पारड्यात टाकलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही मुख्यमंत्रिपदावरील दावा सहजासहजी सोडायला तयार नाही आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा कधी सुटेल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार सर्व सहकारी पक्षांशी चर्चा करून, ताळमेळ साधूनच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे मागच्या चार दिवसांपासून सातत्याने मित्रपक्षांशी चर्चा करण्यात येत आहे. त्यातही महायुतीमधील भाजपाचा प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचं पूर्ण समाधान करण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपासोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही दमदार यश मिळवलं आहे. त्यामुळे आता सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन्ही पक्षांचं महत्त्व आणि उपद्रवमूल्याची भाजपाला जाणीव आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना कुठलाही वाद होऊ नये, याची काळजी भाजपाकडून घेतली जात आहे. तसेच काही काळाने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील एकजूट भाजपाला महत्त्वाची वाटत आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेबाबतचं प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक उचललं जात आहे.
मागच्या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा महायुतीसाठी फायदेशीर ठरला होता. एकनाथ शिंदे हे महायुतीमधील एक प्रभावी मराठा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना सहजासहजी बाजूला करणं भाजपाला सहज शक्य होणार नाही. त्याबरोबरच राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपैकी बहुतांश मुख्यमंत्री हे मराठा होते. त्यामुळे मराठा चेहरा डावलणं हेही भविष्याच्या दृष्टीने अडचणीचं ठरू शकतं.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही शिवसेनेने घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे भाजपाला सत्तेपासून वंचित राहावं लागलं होतं. मात्र २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून केलेल्या बंडामुळे भाजपाला महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा एकदा मिळाली होती. तेव्हा भाजपाने आपले जास्त आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. मात्र आता भाजपानं शिंदेंचं पूर्ण समाधान केल्याशिवाय काही निर्णय घेतल्यास त्यामधून चुकीचा संदेश देशात जाऊ शकतो.
यादरम्यान, शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांकडून बिहार पॅटर्न वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली होती. तसेच त्यांच्या लोकप्रियतेमुळेच हा विजय मिळाला आहे, असा दावाही केला जात आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. या सर्वांचा विचारही भाजपाला मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेताना करावा लागणार आहे.
भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. तसेच ऐनवेळी एखादा ओबीसी चेहरा समोर आणण्याचीही तयारी आहे. मात्र राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही निर्णय अडचणीचे ठरू शकतात. त्यात अजित पवार गट हाही फडणवीस यांच्या ऐवजी अन्य कुणाच्या मुख्यमंत्रिपदावर फारसा राजी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यादरम्यान भाजपा काय निर्णय घेतो आणि एकनाथ शिंदे यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.