लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या १४ निवडणुका लढवल्या, कोण आहेत हे अवलिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:51 AM2024-10-29T11:51:00+5:302024-10-29T11:55:47+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यातील बाबासाहेब शिंदे नावाचे एक अवलिया ९ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर आता पंधराव्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.

लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत कुठल्याही निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय पक्षांसोबत अनेक हौशी उमेदवारही आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. यापैकी काही जण जिंकण्यासाठी नाही तर केवळ हौस म्हणून निवडणूक लढवत असलात.

दरम्यान, मराठवाड्यातील बाबासाहेब शिंदे नावाचे एक अवलिया ९ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर आता पंधराव्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.

जालना जिल्ह्यातील बापखळ गावातील एका श्रीमंत कुटुंबात बाबासाहेब शिंदे यांचा जन्म झाला होता. यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबातील विरोधामुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यानंतर ते राजकारणाकडे वळले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ते आग्रही होते. १९७८ मध्ये त्यांना काँग्रेसने जालन्यामधून विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर त्यांनी धुडकावली होती. १९८० मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ९ लोकसभा आणि १४ विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. आता १५ व्यांदा ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

बाबासाहेब शिंदे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ हून अधिक वर्ष उलटली. तरीही शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. शिक्षित बेरोजगारांकडे नोकऱ्या नाही आहेत. कायद्यांचं काटेकोर पालन होत नाही. देशात भ्रष्टाचार खूप वाढला आहे. तसेच सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, याच कारणांमुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते सांगतात.

दरम्यान, बाळासाहेब शिंदे यांनी राजकारणापायी तब्बल ५० एकर जमीन विकली आहे. आता ते एका छोट्याशा मंदिरात राहतात. त्यांच्याजवळ निवडणूक लढण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. मात्र निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा ते सहज गोळा करतात. शेवटच्या श्वासापर्यंत मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत राहीन आणि लोकशाहीच्या मूल्यांना भक्कम करत राहीन, असं ते सांगतात.