रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:41 AM 2024-11-18T10:41:14+5:30 2024-11-18T11:11:32+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रविवारी (दि.१८) भाजपचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील.
आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते.
त्यानंतर राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीही राज्यात उमेदवारांच्या प्रचाराला आले होते. मागील महिनाभरात प्रचार सभा आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूक रण ढवळून निघाले होते.
याच पार्श्वभूमीवर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रविवारी (दि.१८) भाजपचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, विधानसभा निवडणुकीत आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जात आहोत. मात्र, काँग्रेस व विरोधक केवळ तथ्यहीन बाबींवर जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
याचबरोबर, काँग्रेसला केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करायचे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जमिनीशी जुळून काम कसे करायचे, हे शिकले पाहिजे. नौटंकी करून मते मिळविता येत नाहीत, हे त्यांच्यासोबत मविआच्या नेत्यांना समजायला हवे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याशिवाय, निवडणूक प्रचारात मुद्देच नसल्याने मविआ नेत्यांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये नेतेपदावरून भांडणे आहेत, तर आमच्याकडे महायुतीत कुठलीही स्पर्धा नाही. येणाऱ्या २० तारखेला प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.