महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:27 PM 2024-11-11T17:27:06+5:30 2024-11-11T17:37:27+5:30
२०१९ नंतर राज्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. या निवडणुकीत प्रत्येक जागांवर तिरंगी आणि दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एका एका जागेवर चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखत आहे. बटेंगे तो कटेंगे घोषणा सुरू झाल्यात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पडत आहे. दावे प्रतिदावे यामुळे निवडणुकीच्या निकालात सत्ता कुणाच्या पारड्यात येणार याची उत्सुकता अनेकांना आहे.
महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ३७ मतदारसंघ असे होते जिथे जय पराजयातील अंतर ५ हजार मतांपेक्षा कमी होते. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. त्यातील ५ मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विजयाचे अंतर १ हजार मतांपेक्षा कमी होते. एका मतदारसंघात तर ५०० पेक्षा कमी मताधिक्य होते. मुंबईतील चांदिवली मतदारसंघात शिवसेना उमेदवार अवघ्या ४०९ मतांनी जिंकून आले होते.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे मनोहर यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून भाजपाचे राहुल कुल यांनी एकूण ७४६ मतांनी, सोलापूरच्या सांगोल्यातून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील ७६८ मतांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातून ८२२ मतांनी विजयी झाले.
एक हजारापेक्षा कमी अंतर असलेल्या या पाच जागांव्यतिरिक्त भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताई नगर आणि बीड या चार जागांवर एक ते दोन हजार मतांचा फरक निर्णायक ठरला. या चारपैकी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एका जागेवरून सपा उमेदवार विजयी झाला तर एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८ जागांचा निकाल दोन हजार ते पाच हजार मतांच्या फरकाने लागला. या २८ जागांपैकी १२ जागांवर कमळ फुलले. सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, चार जागांवर काँग्रेस आणि शिवसेना, एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी आणि सीपीआयचे उमेदवार प्रत्येकी दोन आणि एका जागेवर विजयी झाले. एक जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली
लोकसभेचा निकाल पाहता विधानसभा मतदारसंघातील अशा ३१ जागा होत्या जिथे दोन उमेदवारांमधील मतांचा फरक पाच हजारांपेक्षा कमी होता. या ३१ विधानसभा मतदारसंघांपैकी १६ मतदारसंघांत विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आघाडी होती, तर १५ मतदारसंघांत सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांची आघाडी होती.
महाराष्ट्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या जागांचा राजकीय मूडही महत्त्वाचा मानला जात आहे. ही आकडेवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आधारित आहे आणि विधानसभा निवडणुकीत मुद्द्यांपासून ते मतदानाच्या पद्धतींपर्यंत बरीच तफावत आहे. त्यामुळे या ३१ जागांवर कोण बाजी मारणार हे पाहणे गरजेचे आहे.