देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:21 PM2024-11-05T18:21:45+5:302024-11-05T18:45:47+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील जिवती तालुक्याच्या तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावांच्या सीमावादाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. या गावांतील ५ हजार २९३ मतदारांचा दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत समावेश आहे.

तेलंगणा राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे आताच्या महाराष्ट्र विधानसभा लढवणाऱ्या उमेदवारांनी या गावातील मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्यात. त्यामुळे या गावांतही सध्या इलेक्शन फिव्हर दिसून येत आहे.

मागील वर्षी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर रणकंदन सुरू होते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांनी रान उठवून मराठी अस्मितेसाठी प्रयत्नही केले. मात्र जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्यांच्या सीमावादात होरपळणाऱ्या १४ गावांतील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न २६ वर्षापासून दुर्लक्ष राहिला आहे.

१७ जुलै १९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राची असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पण महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकार आजघडीला या गावांवर आपला हक्क गाजवत प्रशासकीय आणि राजकीय हस्तक्षेप सुरूच ठेवला आहे.

मागील ३ दशकांपासून दोन राज्यांच्या कचाट्यात सापडलेल्या १४ गावांत सर्व मराठी भाषिक आहेत. तेलंगणातून बाहेर काढण्यासाठी का वेळ भेटत नाही असा प्रश्न आता मतदारांनी उमेदवारांपासून उपस्थित केला आहे.

तेलंगणा सीमेवरील ही १४ गावे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात येतात आणि तेलंगणा राज्यातील आसिफाबाद विधानसभा क्षेत्रातही या गावांचा समावेश आहे.

या १४ गावांतील नागरिकांचा महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही राज्यांच्या सरकारच्या मतदार यादीत समावेश आहे. या गावातील एकूण मतदारसंख्या ५ हजार २९३ इतकी आहे.

१९८९ पासून १४ गावांतील नागरिक पूर्वीच्या आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणा राज्याच्या मतदारसंघाचे अधिकृत मतदार आहेत. दोन्ही राज्यांच्या प्रत्येक निवडणुकीत अधिकृतपणे मतदान करणारे हे महाराष्ट्रातीलच नसून देशातील एकमेव उदाहरण आहे. मात्र अजून किती काळ दोन्ही राज्यात मतदान करायचं असा प्रश्न येथील मतदार उपस्थित करत आहेत.

राजुरा मतदारसंघात भाजपाने देवराव भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना भाजपामधूनच माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी विरोध केला. या दोघांनी अपक्ष अर्जही भरला परंतु पक्षश्रेष्ठींना त्यांची मनधरणी करण्यात यश आले. अखेरच्या दिवशी दोघांनी राजीनामा परत घेतला.