या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:57 AM2024-12-02T11:57:26+5:302024-12-02T12:01:34+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Result: महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतरही मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे चिंतीत आहेत. शिंदेंसमोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास त्यांचा आक्षेप का आहे, याचा आढावा पुढीलप्रमाणे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपाला तब्बल १३२ जागा मिळाल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणं कठीण दिसत आहे. मात्र मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे चिंतीत आहेत. शिंदेंसमोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास त्यांचा आक्षेप का आहे, याचा आढावा पुढीलप्रमाणे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडल्यास त्यांना काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. २०२२ साली शिवसेनेत फूट पाडून केवळ ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं होतं. त्यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आपल्या ध्येयधोरणांपासून भरकटला आहे, असा आरोप केला. दुसरीकडे २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने भाजपासोबतची आघाडी तोडली होती, त्यावेळी एकनाथ शिंदे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर २०१९ प्रमाणेच परिस्थिती आहे. तसेच शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं आहे. तसेच भाजपा त्यांना हे पद देण्यास इच्छूक नाही आहे.

मुख्यमंत्रिपद सोडल्यावर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे हे इच्छूक नाहीत. त्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा आहे. मात्र असं केल्यास एकनाथ शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. हाच आरोप एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यावर करत होते तसेच त्यांनी या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मात्र आता अशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यासमोर दिसत होती.

विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर आता पुढच्या काही काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता दीर्घकाळापासून राहिलेली आहे. आताही विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत १० जागा जिंकल्या होत्या. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यास ते भाजपासमोर झुकल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो. तसेच भाजपासोबत जाणाऱ्या शिवसैनिकांची अशीच अवस्था होऊ शकते, असा नरेटिव्ही ठाकरे गटाकडून सेट केला जाऊ शकतो. त्याचा मुंबई मनपा निवडणुकीत शिंदे गटाला धक्का बसू शकतो.

एकनाथ शिंदे हे मागच्या काही काळात महाराष्ट्रातील एक वजनदार मराठा नेते बनले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजात फारसे लोकप्रिय नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा बोचरी टीका केलेली आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद न दिल्यास मराठा समाजामध्ये भाजपाबाबत नाराजी वाढू शकते. तसेच शिवसेना शिंदे गटाकडे वळलेला मतदार हा पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे वळू शकतो.

महायुतीने ही विधानसभेची निवडणूक ही आपल्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली, असे एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत असतात. आपल्या नेतृत्वाखालील सरकारने अडीच वर्षांत चांगलं काम केलं. मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाच्या अडीअडचणी समजू शकतो. आतापर्यंत महाराष्ट्रातील सरकारने अशा प्रकारे पुनरागमन केलेलं नाही, असा एकनाथ शिंदे यांचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम आणि मोठा विजय मिळाल्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास मुख्यमंत्रिपद का मिळालं नाही याचं उत्तर एकनाथ शिंदे यांना द्यावं लागणार आहे.