लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:42 PM2024-10-28T16:42:48+5:302024-10-28T16:51:36+5:30

महाराष्ट्रात मुस्लीम मतदारांची संख्या जवळपास १२ टक्के इतकी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ११.५४ टक्के म्हणजे १.५ कोटी मु्स्लीम लोकसंख्या आहेत. हे मुस्लीम मतदार महाराष्ट्रातील ४० जागांवर निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे या ४० जागांवर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता २३ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतांची गणिते जुळवताना दिसून येतो. महायुतीपासून महाविकास आघाडी, वंचित, मनसे आणि इतर पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. यात समाजवादी पक्ष आणि MIM यांनी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. लोकसभेला समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभेला अद्याप सपा आणि मविआ यांच्यात जागावाटप निश्चित नाही.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना अद्याप महाविकास आघाडीत जागा न सोडल्याने ते नाराज असल्याचं बोललं जाते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाला मविआने २ जागा देण्याची तयारी केली आहे तर समाजवादी पक्ष ५ जागांवर अडून आहे. त्यामुळे त्यांनी मविआला इशाराही दिला आहे.

समाजवादी पार्टी आणि असदुद्दीन औवेसी यांच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. या दोन पक्षांनी मुस्लीम बहुल भागात उमेदवार उतरवण्याने थेट मुस्लिम मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातून निकालात महाविकास आघाडीला झटका बसू शकतो.

असदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षाने स्वबळावर महाराष्ट्रात ४५ ठिकाणी उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत एमआयएमनं ४४ जागांवर विधानसभा निवडणूक लढवली त्यातील अशा अनेक जागा आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या ३० टक्क्याहून अधिक आहे.

औवेसी यांच्या पक्षाला मुस्लीम, दलित आणि मागासवर्गीयांचे मते मिळाली तर एमआयएमला राज्याच्या निवडणुकीत चांगले यश मिळेल अशी आशा त्यांच्या पक्षातील नेत्यांना वाटते. मागील निवडणुकीत काँग्रेस ३, राष्ट्रवादी २ आणि समाजवादी २, एमआयएम आणि शिवसेनेचे १-१ मुस्लीम आमदार निवडून आले होते.

२०११ नुसार महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या १.५ कोटी इतकी असून २०२४ मध्ये या संख्येत वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ, सोलापूर या भागात मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे.

मुस्लीम लोकसंख्येच्या निर्णायक मतदानामुळे ४० जागांवर परिणाम होऊ शकतो. मागील निवडणुकीत १० मुस्लीम आमदार विधानसभेत निवडून आले होते. ज्यात काँग्रेस ३, राष्ट्रवादी २, सपा २, एमआयएम आणि शिवसेना प्रत्येकी १ असे आमदार होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून आले तर भायखळा मतदारसंघातून वारिस पठाण यांनी विजय मिळवला होता. यंदा औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमने नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. जे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते.

एमआयएमनं यंदाच्या विधानसभेसाठी इम्तियाज जलील यांच्यासह ६ जणांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यात औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, अकोल्यातील मूर्तिजापूर, सांगलीतील मिरज, मुंब्रा कळवा, भायखळा, वर्सोवा याठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.