दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 04:31 PM2024-11-17T16:31:55+5:302024-11-17T16:40:17+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे.

अनेक मतदारांकडे दोन मतदान पत्र असल्याचे आढळून येते. तालुका तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येतात. परंतु एकाच मतदाराने दोन मतदान कार्ड वापरणे कायद्याने गुन्हा आहे. असे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी एकाच ठिकाणी असलेले आपले मतदान कायम ठेवून अन्य ठिकाणी असलेले मतदार यादीतून नाव मागे घेण्याची गरज आहे.

अनेक नागरिकांचे शहरात व गावाकडे अशा दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असतात. तसेच त्यांच्याकडे दोन्ही ठिकाणचे मतदान कार्ड असते. मतदानाच्या दिवशी दोन ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. मतदाराने एकाच ठिकाणी आपले नाव ठेवून अन्य ठिकाणचे नाव रद्द करणे आवश्यक आहे.

एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी मतदाराला फॉर्म-७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केली जाऊ शकते. सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला काहीकाळ प्रतीक्षा करावी लागेल. मतदार यादीत दोनदा नाव असेल तर तो गुन्हा ठरतो.

ईसीआयच्या वेबसाइटवर जाऊन तिथे तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म-७ भरावा लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का? हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता. ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयातून तुमचे मतदार यादीतील नाव वगळण्यात येते.

मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे. नागरिकांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य असते. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र मतदाराने स्वतःजवळ बाळगल्यास तुम्हाला हमखास चरुंगवास भोगावा लागू शकतो. कारण मतदार यादीत एकापेक्षा अधिक वेळा मतदार म्हणून नोंदणी केल्यास तो एक मोठा गुन्हा ठरतो.