Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 07:33 PM2024-11-19T19:33:00+5:302024-11-19T19:33:00+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : ...यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आखलेल्या रणनीतीचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. काही योजना आणि मुद्दे महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक सिद्ध होऊ शकतात.

यावेळी महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे एक अभूतपूर्व निवडणूक म्हणून बघितले जात आहे. कारण या निवडणुकीत एकूण सहा मुख्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात जरांगे आंदोलनाचा फटका बसला आणि एकूण 8 जागांपैकी संदिपान भुमरे यांच्या रुपाने केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचीच जागा जिंकता आली.

भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात रावसाहेब दानवे आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आखलेल्या रणनीतीचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. काही योजना आणि मुद्दे महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक सिद्ध होऊ शकतात.

गेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला. मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकला आली नव्हती. येथील 8 लोकसभा जागांपैकी 3 जागा काँग्रेसला, 3 शिवसेनेला (ठाकरे गट), एक एनसीपीला (शरद पवार गट) आणि एक शिवसेना शिंदे गटाला मिळाली होती. विशेष म्हणजे, यात आठपैकी सात मराठा खासदार आहेत.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड़, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यांतील विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत. येथे 2019 मध्ये युतीने एकूण 28 जागा जिंकल्या होत्या. यांपैकी भाजपला 16 तर शिवसेनेला (अखंड) 12 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (अखंड) प्रत्येकी आठ-आठ जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागा इतरांना मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी जरांगे आंदोलनाचा किती आणि कसा परिणाम होतो, यावर बरंच काही ठरणार आहे.

मराठवाड्यात भाजप 20 जागांवर निवडणूक लढत आहे, शिवसेना शिंदेगट 16 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 9, तसेच रासपा 1 जागांवर निवडणूक लढत आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्ष अनुक्रमे 15-16-15 जागांवर निवडणूक लढवत आहेत. यामुळे एकूण 6 मोठे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

महायुतीसाठी हे मुद्दे ठरू शकतात मास्टर स्ट्रोक - 1. हिंदुत्वाचा मुद्दा - महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातही हिंदुत्वाच्या मुद्द्याची जबरदस्त चर्चा आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा सुरुवातीला होती. हा मुद्दा प्रभावीही वाटत होता. मात्र, आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जरांगेंनी जाहीर केलं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, अशी भूमिका घेतली आणि हळूहळू तो 'फॅक्टर' निवळला. दुसरीकडे, निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने 'बटेंगे तो कटेंगे आणि 'एक है तो सेफ है' घोषणा देत हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखर केला.

2. उलेमांच्या मागण्यांचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता - दरम्यान, ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ने महाविकास आघाडीकडे पाठिंब्याच्या बदल्यात 17 मागण्या केल्या. यामुळे भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा अधिकच जोमाने उचलला. यातच भाजपने 'व्होट जिहाद VS मतांचे धर्मयुद्ध' अशा आशयाचे आवाहन जनतेला केले आहे. यामुळे महायुतीपासून काही क्षुल्लक कारणाने दुरावलेले मतदार पुन्हा महायुतीकडे आकर्षित होऊ शकतात. जसे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेला मराठा समाज.

3. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना - राज्यात महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचीही बरीच चर्चा आहे. याचा मोठा फायदा महायुतीला होऊ शकतो. या योजनेंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकते. मोठ्या प्रमाणावर महिला याचा लाभ घेत आहेत. महिला वर्ग यासंदर्भात चर्चा करतानाही दिसत आहे.

4. मराठवाड्यातील रस्ते... - मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे, याचीही प्रचारादरम्यान सर्वसामान्यांमध्ये चर्चा होती. गेल्या 15 वर्षांत अगदी गावा-गावांपर्यंत (अपवाद वगळता) पक्के रस्ते पोहोचले आहेत. यामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. महत्वाचे म्हणजे, समृद्धी महामार्ग. या महामार्गाने विदर्भ-मराठवाडा आणि मुंबईला जोडले. तसेच, धुळे-सोलापूर महामार्ग, जो मराठवाड्यातून जातो. याशिवाय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग तयार होत आहे.